Pune Politics: महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभा निवडणुकीत तोडीस तोड उमेदवार रिंगणात उतरवले असताना वंचित बहुजन आघाडीने आत्तापर्यंत पुण्यात सात उमेदवार जाहीर केले आहेत. वंचितने दिलेले हे उमेदवार निवडून येणार की प्रतिस्पर्धी उमेदवारांची डोकेदुखी वाढवणार, हे विधानसभेच्या निकालानंतर स्पष्ट होईल. दरम्यान, सातही उमेदवार आज मंगळवारी (दि.29) अर्ज दाखल करणार असल्याची माहिती वंचितचे शहराध्यक्ष अॅड. अरविंद तायडे आणि संघटक नागेश भोसले यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीने कॅन्टोन्मेंट परिसरात नीलेश आल्हाट यांना रिंगणात उतरवले आहे. नुकताच त्यांनी आरपीआय आठवले गटातून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे. त्याबरोबरच वंचितने हडपसरमधून कोंढवा परिसरात राहणारे मुस्लिम समाजातील उच्चशिक्षित उमेदवार अॅड. अफरोझ मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे.
वडगाव शेरी परिसरात वंचितच्या माध्यमातून गेली दहा वर्षे कार्यरत असलेल्या आंबेडकरी चळवळ आणि सामाजिक कार्यातून परिचित असलेल्या विवेक लोंढे यांना वंचितने विधानसभेत रिंगणात उतरवले आहे. एकीकडे महायुतीने माधुरी मिसाळ, महाविकास आघाडीने अश्विनी कदम यांना पर्वती मतदारसंघातून उमेदवारी दिली असताना वंचितनेही या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या महिला उमेदवार सुरेखा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. तर खडकवासलामधून संजय जयराम धिवार यांना, कसबा मतदारसंघातून प्रफुल्ल सोमनाथ गुजर तर कोथरूडमधून वंचितकडून योगेश दीपक राजापूरकर यांना उमेदवारी दिली आहे.