पुणे; पुढारी वृत्तसेवा : अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला वीज वितरणाचा समांतर परवाना देणे तसेच वीज उद्योगांचे खासगीकरण याविरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या वतीने महावितरणच्या रास्ता पेठ येथील मुख्य कार्यालयासमोर बुधवारी दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले. 'खासगीकरण रद्द करा', 'अदानी गो बॅक' अशा घोषणा देत महावितरणच्या कर्मचार्यांनी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांचा निषेध नोंदविला.
वीज कायद्यातील तरतुदींचा आधार घेत अदानी इलेक्ट्रिकल कंपनीने महावितरणच्या भांडुप परिमंडलात वीजवितरण करण्यासाठी विद्युत नियामक आयोगाकडे समांतर परवाना मागितला आहे. त्याविरोधात तीनही वीज कंपन्यांमधील तीस संघटनांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला होता. त्याअंतर्गत महावितरणच्या पुणे परिमंडलातील सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांनी महावितरणच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संपात सहभागी संघटनांच्या प्रतिनिधींनी भाषणे करताना सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणावर टीका केली. शहरातील विविध संस्था, संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, या आंदोलनामुळे महावितरणच्या मुख्य कार्यालया समोरच्या चौकात दुपारच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बॅरिकेडिंग करीत रस्ता मोकळा केला.
छुप्या पद्धतीने खासगीकरणाचा आरोप
केंद्र सरकारचा सुधारित वीज कायदा येण्यापूर्वी राज्यात कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करणे, महापारेषण कंपनीचे दरवाजे खासगी भांडवलदारांना खुले करणे, महानिर्मिती कंपनीच्या अखत्यारीतील जलविद्युत केंद्राचे पुननिर्माण करण्याच्या नावाखाली खासगीकरण करणे, तिन्ही वीज कंपन्यांतील हजारो पदे रिक्त ठेवून कंत्राटी किंवा बाह्यस्रोत पद्धतीने कामगार नेमणे, वीज कंपन्यांमधील दैनंदिन कामे खासगी भांडवलदारांना देणे, नवीन उपकेंद्रे पूर्णपणे ठेकेदारी पद्धतीने चालविणे आदी मार्गांचा अवलंब करून वीज कंपन्यांमध्ये छुप्या पद्धतीने खासगीकरण केले जात आहे. त्यामध्ये खासगी भांडवलदारांना नफ्यातील परिमंडलात वीज वितरणाचा समांतर परवाना देण्याचा प्रयत्न हा महावितरणच्या खासगीकरणाचा डाव असल्याची टीका कामगार संघटनांनी केली.