भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा : रायतेमळा (सणसर) येथे सोमवारी (दि. 13) रात्री निरा डावा कालवा फुटला. कालव्याचे पाणी शेतामधून वाहिल्याने शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परिणामी, नुकसानग्रस्त शेतकरी घायकुतीला आले आहेत. निरा डावा कालवा फुटल्यानंतर पाणी कालव्याच्या मोरीमधून वाहत शेतामध्ये गेले. सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत कालव्याच्या वितरिकांमधून शेतामध्ये पाणी शिरले. शेतातील पिकांचे तसेच जमिनीचे नुकसान केल्यानंतर ते पाणी पुढे ओढ्यामधून वाहून गेले. परिणामी, शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कालव्यापासून जवळच असणार्या बाळासाहेब नेवसे यांच्या डाळिंबबागेमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहिले.
नेवसे यांच्या डाळिंबाच्या झाडांना कळी लागली होती. मात्र, अतिरिक्त पाणी मिळाल्याने संपूर्ण बागेतील फुलगळ होऊन नेवसे यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याबरोबरच नेवसेवस्ती, निंबाळकरवस्ती येथील उत्तम नेवसे, राणी निंबाळकर, पृथ्वीराज निंबाळकर, पांडुरंग बारवकर, हेमंत निंबाळकर, शहाजी भोसले, हनुमंत पाठक, राम पाठक यांच्यासह अनेक शेतकर्यांच्या शेतातील ऊस, मका, कडवळ, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, अनेक ग्रामस्थांच्या घरांमध्येही पाणी शिरून नुकसान झाले आहे. काही शेतकर्यांची शेती या पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली आहे.
तहसीलदारांनी शेतकर्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. सणसर ग्रामपंचायतीचे सरपंच पार्थ निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह निंबाळकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तानाजी थोरात, श्रीराज भरणे आदींसह राजकीय पदाधिकार्यांनी शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. पार्थ निंबाळकर यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती ग्रामपंचायतमध्ये द्यावी, असे आवाहन केले आहे.