मंचर (ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : लग्न म्हटले की तिथीच्या 15 ते 20 दिवस अगोदरच भावकितीतील लोकांना सर्व जबाबदारी वाटून दिली जाते. मात्र, निरगुडसर येथे मुलाचे घर पाहण्यासाठी आलेले मुलीकडचे कुटुंबीय लग्न लावूनच घरी गेले. मंगळवार दि. 13 अनावश्यक खर्च टाळत सर्व विधी एकाच दिवशी पार पडले. निरगुडसर येथील सुरेश राऊत यांचा मुलगा मंगेश व संगमनेर येथिल साईखिंडीचे रवींद्र डगले यांची कन्या सुजाता यांचा विवाह निरगुडसर येथे झाला.
दोन दिवसापूर्वी निघोज या ठिकाणीं एका दशक्रिया कार्यक्रमात डगले कुटुंबीय व राऊत कुटुंबीय यांची विवाह संदर्भात थोडक्यात बोलाचाली झाली होती. त्यानंतर सोमवारी (दि.12) मुलाकडचे लोक मुलगीचे घर पाहून आले. नंतर मुलीकडचे कुटुंबीय मंगळवारी (दि.13) निरगुडसर येथे मुलगा व त्याचे घर पाहण्यासाठी आले होते.
मुलींच्या कुटुंबीयांना घर मुलगा इतर बाबी आवडल्याने गंध व लग्नाची बोलाचारी सुरू झाली. लग्नाबाबत बोलणी असतानाच मुलाकडच्या लोकांनी मंगेश हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने घरात फक्त आई व मुलगा असल्याने जबाबदार व्यक्ती म्हणुन मुलाचे चुलते गणपत राऊत, चुलत भाऊ महेश राऊत शेजारी राहणार्या उज्वला जाधव, श्रीराम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी आपली दोन्ही कुटुंबे सर्वसामान्य आहेत.
वारंवार खर्च करणे परवडणार नाही. त्यामुळे आजचा मुहूर्त चांगला असून लग्नाचे सर्व विधी पूर्ण करून लग्न लावून घेऊ असे मत मांडले. मुलीकडच्यांनीही त्याला होकार दिला. त्यानंतर मुलाकडच्या, मुलीकडच्या लोकांनी लगेचच भावकी, मित्र परिवार यांना फोन द्वारे संपर्क करून साखरपुडा, लग्नाची वेळ सांगितली.
मुलाचा, मुलीचा बस्ता एकाच ठिकाणी घेतला गेला तोपर्यंत मुलिकडचे वर्हाड ही मुलाच्या घरी आले. निरगुडसर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात साखरपुडा करुन वधू वराच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर जेवण व सायंकाळी 5 : 30 दरम्यान विवाह पार पडला. निरगुडेश्वर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष प्रतापराव वळसे पाटील, उपसरपंच आनंदराव वळसे पाटील, शांताराम गावडे, उद्योजक मनीषा वळसे पाटील यासह गावातील विविध मान्यवर उपस्थित होते.
वायफळ खर्च टाळण्याचा समाजात संदेश
आजकाल मोठ्या प्रमाणात लग्नामध्ये खर्च केला जातो, मिरवणूक,डीजे, साऊंड सिस्टिम, हॉल, हळद, फोटोग्राफी, रिसेपशन, यासह विविध कार्यक्रम ठेवून मोठा खर्च केला जातो. मात्र राऊत व डगले कुटुबियानी एकाच दिवशी सर्व विधी पूर्ण करून लग्न समारंभ कार्यक्रम संपन्न केल्याने दोन्ही कुटुंबाचा पैसा वाचून यातून एक संदेश समाजात गेला आहे.– रवींद्र वळसे पाटील, माजी उपसरपंच निरगुडसर.