पुणे

शरद पवार, सुप्रिया सुळे यांना खुल्या चर्चेस बोलवा; विजय शिवतारेंनी स्वीकारले झेंडे यांचे आव्हान

अमृता चौगुले

सासवड(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतीमध्ये एक सदस्य निवडून आणता येत नाही, अशा व्यक्तीने मला खुल्या चर्चेचे आव्हान दिलं आहे. ते मी स्वीकारलं आहे. फावल्या वेळेत राजकारणात आलेल्या व्यक्तींसोबत खुल्या चर्चा करण्यापेक्षा ज्यांना आम्ही पाच दशकं मतं देत आलोय ते शरद पवार आणि मागच्या 17 वर्षांपासून संसदेत निष्क्रिय बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना खुल्या चर्चेला बोलवा, असे आव्हान माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांना दिले.

चांबळी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती झेंडे, तालुका उपप्रमुख संजय कटके, राजाराम झेंडे, माजी उपसभापती दत्तात्रय काळे, महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक गीतांजली ढोणे, सरपंच प्रतिभा कदम, माजी सरपंच सुनंदा कामठे, शाखाप्रमुख बाबासाहेब कामठे, अशोक कामठे, महेश कामठे, अंकुश कामठे, मोहन शेंडकर आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी गीतांजली ढोणे यांच्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शिवतारे म्हणाले, पुरंदरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांना विमानतळ पळवून नेलं तरी काही वाटत नाही. पाणी पळवले तरी हे गप्प असतात. राष्ट्रीय बाजार तालुक्यातून बाहेर नेला तरी यांना सोयरसुतक नसते. मात्र, पवारांवर टीका केली की यांचं पित्त खवळतं. त्यामुळे यांचा डीएनए पुरंदरच्या स्वाभिमानी मातीचा आहे का, असा प्रश्न उभा राहणं साहजिक आहे. तालुक्यात आज दिसणारं रस्त्यांचं जाळं, सिमेंट बंधारे, शेततळी, जेजुरी रुग्णालय, धान्य गोदाम, दिवे आरटीओ, क्रीडासंकुल असे अनेक प्रकल्प मागील काळात आम्ही केले. आजच्या नेतृत्वाला तालुक्यात कुठलाही मोठा प्रकल्प आणता आला नाही, अशी टीका शिवतारे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT