अशोक मोराळे
पुणे : एका बाजूला भविष्यातील सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारा केतन अगरवाल... तर दुसरीकडे त्याच्यासोबत प्रेमाचा मुखवटा धारण करीत फिरणारी त्याची भावी पत्नी सिया गोयल; पण केतनला कल्पनाही नव्हती की, त्याच्या चेहऱ्यावरचे हसू पाहत असतानाच तिने त्याच्या मृत्यूची पटकथा आधीच लिहून ठेवली होती. तीही लोहगडाच्या कड्यावर नव्हे, तर लुल्लानगरमधील एका कॅफेतील टेबलावर शांतपणे कॉफीचा घोट घेत-घेत...
केतन अग्रवाल याच्या खुनाच्या आदल्या दिवशी म्हणजे १७ जून रोजी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी हे दोघेजण कोंढव्यातील लुल्लानगर परिसरातील थर्ड वेव्ह कॅफेमध्ये भेटल्याचे समोर आले आहे. दोघे या कॅफेतील कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून, एकत्र एका टेबलवर चर्चा करताना दिसून येत आहेत. या भेटीदरम्यान दोघांनी केतनच्या खुनाचा कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दि. १८ जून रोजी सिया आणि चेतन या दोघांनी मिळून केतन याला लोहगड किल्ल्यावरून ढकलून दिले. सुरुवातीला सिया हिने अपघाताचा बनाव रचला. मात्र चेतनच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेली शंका आणि पुणे ग्रामिण पोलिसांनी केलेल्या तपासामुळे खुनाचा प्रकार समोर आला. सध्या दोघे आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून, त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे.
चेतन अगरवाल खून प्रकरणात वेगवेगळे खुलासे आरोपींच्या चौकशीत समोर येत आहेत. सिया हिला चेतन सोबल लग्न करायचे नव्हते. काही करून तिला आपल्या वाटेतून त्याला दुर करायचे होते. यासाठी तिने आपला प्रियकर चेतन चौधरी याला सोबत घेतले. दोघांनी मिळून चेतन याला कसे कायमचे संपविता येईल याची योजना तयार केली. त्यासाठी दोघे १७ जून रोजी म्हणजेच खूनाच्या एक दिवस अगोदर कोंढवा लुल्लानगर येथील थर्ड व्हेव कॅफेत भेटल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्या कॅफेमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघे दुपारी सुमारे ४ वाजून ३५ मिनिटांनी कॅफेमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत.
एकंदर केतन याच्या खूनप्रकरणात सिया आणि चेतन या दोघांची आत्तापर्यंत समोर आलेली माहिती पाहिली तर अतिशय शांत डोक्याने नियोजन करून त्याचा खून (कोल्ड ब्लडेड मर्डर) करण्यात आल्याचे दिसते.