पारगाव: गेल्या दोन-तीन महिन्यांपासून कोबी-फ्लॉवरचे बाजारभाव घसरले आहेत. सध्याच्या चाराटंचाईच्या काळात कोबी-फ्लॉवरचा उपयोग जनावरांच्या चार्यासाठी सर्रास होत आहे. आंबेगाव तालुक्यातील रांजणी परिसरात अनेक कोबी-फ्लॉवरच्या शेतांमध्ये मेंढपाळांनी मुक्काम ठोकला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वच गावांमध्ये कोबी-फ्लॉवरचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून पिकाला बाजारभावाची साथ मिळालेली नाही. दोन-तीन रुपये किलो बाजारभाव सध्या मिळत आहे.
हा भाव गुंतविलेल्या भांडवलाच्या तुलनेत अतिशय कमी आहे. यातून भांडवल देखील वसूल होत नाही. उलट मजुरी व वाहतूक भाडे शेतकर्यांच्या अंगावर पडते. यामुळे कोबी-फ्लॉवर उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
कोबी-फ्लॉवर पिकांचा उपयोग मेंढपाळ जनावरांसाठी चारा म्हणून करू लागले आहेत. मेंढपाळ आता कोबी-फ्लॉवरच्याच शेतामध्ये शेळ्या-मेंढ्यांसह मुक्काम करत आहेत. काही जनावरांचे मालक कोबी-फ्लॉवरचे गड्डे ट्रॅक्टरट्रॉलीत भरून घेऊन जात आहेत.
90 पैसे दराने सुमारे 33 हजार फ्लॉवरची रोपे लावली होती. खते, औषधे, मजुरीसाठी एक लाख रुपये खर्च झाला. परंतु, पीक काढणीला आल्यानंतर बाजारभावात मोठी घसरण झाली. गुंतविलेले भांडवल वसूल होत नाही. त्यामुळे पिकामध्ये जनावरे सोडावी लागली.- शरद थोरात, शेतकरी रांजणी