परतीच्या पावसाचा कोबी, फ्लॉवर, बीट या पिकांना मोठा फटका बसला आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये शेतात साचलेल्या पावसाच्या पाण्याने कोबी फ्लॉवरचे पीक सडून गेले आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर या गावांमध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये परतीचा पाऊस अनेकवेळा पडला. या पावसाचे पाणी पिकांमध्ये साचून राहिले. कोबी, फ्लॉवर, बीट या पिकांना सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. परंतु पिकांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने या पिकांची पाने सडून गेली. अनेक शेतकर्यांचे यामध्ये मोठे नुकसान झाले. कोबीला 10 किलोला 250 रुपये, फ्लॉवर पिकाला 275 रुपये असा चांगला बाजारभाव
मिळत आहे. परंतू पावसाचा फटका बसल्याने कोबी, फ्लॉवर पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे या पिकांची बाजारपेठांमध्ये आवक कमी होत आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या बटाटा पिकावर लाल कोळी, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यात सततच्या पावसामुळे बटाटा पिकाचा पाला सडू लागला आहेत. शेतकर्यांनी रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषध फवारणी सुरू केली आहे. मात्र, या रोगांमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. या नव्या संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
तालुक्यात पूर्व भागातील मंचर, अवसरी, लाखनगाव, देवगाव, काठापूर, पोंदेवाडी, मेंगडेवाडी, पिंपळगाव, खडकी, भराडी, थोरांदळे, नागापूर परिसरात शेतकर्यांनी बटाट्याचे पीक घेतले आहे. परंतु, सुरुवातीपासूनच पाणीटंचाईचा फटका या पिकाला बसला. त्यानंतर उष्णतेचाही परिणाम बटाट्यावर झाला. आता सततच्या पावसानेही बटाट्याला झोडपून काढले आहे. त्यातच ढगाळ व उष्ण वातावरणामुळे बटाटा पिकावर लाल कोळी, करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकर्यांनी महागड्या औषधांची फवारणी सुरू केली आहे. मात्र, सततच्या पावसाचे पाणी पाल्यांमध्ये साचून राहिल्याने बटाट्याचा पाला सडू लागला आहे. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.