पिंपरखेड: बेटभागातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल वातावरणावर मात करून कोबी पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले. मात्र, सध्या बाजारात कोबीला मिळणारा दर फक्त प्रति किलो 3 ते 5 रुपये असल्याने शेतकरी हताश झाले आहेत. कवडीमोल भावामुळे काढणी व वाहतूक खर्चदेखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
बेटभागात खरीप हंगामात कोबी व फ्लॉवर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. गेल्या महिन्यात सततच्या रिमझिम पावसाने फ्लॉवर पिकाचे नुकसान झाले होते. त्यामुळे उत्पादनखर्च निघाला नाही. (Latest Pune News)
आता कोबी पिकाच्या बाबतीतही घसरलेल्या बाजारभावाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. हवामानातील लहरीपणामुळे गरजेनुसार औषध फवारणी करून पीक वाचवले असले तरी खर्च वाढून गेला आहे. बाजारात चांगल्या प्रतीचे कोबी असूनही दर समाधानकारक नाहीत.
सध्या लहान गड्डा 5 ते 7 रुपये किलो तर मोठा गड्डा फक्त 3 ते 5 रुपये किलो या दराने विकला जात आहे. उत्पादन खर्च, काढणी व वाहतूक खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर पाहता शेतकऱ्यांचा खर्च वसूल होणेही कठीण झाले आहे. परिणामी कोबी उत्पादक शेतकरी हतबल झाले असून, शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.