पुणे

पुणे : पाणीमीटरला बायपास करून नळजोडणी!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत महापालिकेने बसविलेल्या पाणीमीटरला अनेकांनी बायपास केल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, पाणीमीटरमुळे नागरिकांचाच फायदा होणार आहे. मीटरमुळे सर्व नागरिकांना समान पाणी मिळण्यास मदत होणार असल्याने नागरिकांनी मीटरला विरोध करू नये, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी केले.

शहरातील नागरिकांना समान पाणीपुरवठा करण्यासाठी आणि पाणीगळती रोखण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. या योजनेतंर्गत शहरातील सर्व घरगुती आणि व्यावसायिक मिळकती असे तब्बल साडेतीन लाख पाणीमीटर बसविण्यात येणार आहेत. त्यामध्ये आत्तापर्यंत 1 लाख पाण्याचे मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

प्रतिमाणशी 150 लिटर या निकषांनुसार चार ते पाच सदस्य असलेल्या कुटुंबासाठी 600 ते 750 लिटर पाणी वापर होणे आवश्यक आहे. मात्र, ज्या ठिकाणी मीटर बसविण्यात आले आहेत त्यातील जवळपास 8 हजार ठिकाणी वापर हा 1 हजार लिटरपेक्षा जास्त होत असल्याचे आढळले आहे. महापालिकेने यातील 4 हजार 600 जणांना आतापर्यंत पाणी वापर कमी करण्याच्या नोटिसा बजाविल्या आहेत. अन्यथा, कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. या नोटिसांवरून महापालिका प्रशासनावर टीका केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त बिनवडे म्हणाले, अनेकांनी पाणीमीटरला बायपास करून अनधिकृतपणे तीन-तीन ठिकाणी नळजोड केले आहेत. अशांवर मीटरमुळे प्रमाणापेक्षा अधिक पाणी वापरणार्‍यांवर निर्बंध येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणीमीटरला विरोध करू नये. जादा पाणी वापरामुळे नोटीस दिल्या असल्या, तरी कोणालाही मीटरनुसार बिल आकारले जात नाही.' पाण्यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला असून, अनेकांनी घरातील लोकांची संख्या कमी सांगितली आहे, असेही ते म्हणाले.

SCROLL FOR NEXT