पुणे

पीक विमा योजनेपासून लोणीतील शेतकरी वंचित

अमृता चौगुले

लोणी-धामणी(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : लोणी  येथील अनेक शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा वेळेवर भरला. चालू वर्षी या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. पिके पूर्णपणे पाण्यात गेली. ही वस्तुस्थिती कृषी विभागाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्यात आले. तरी पीक विम्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. संबंधित कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

येथील शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नियमाप्रमाणे सर्व प्रकिया पूर्ण केली होती. ही प्रक्रिया करून देखील आमची ही अवस्था तर ज्यांनी विमा उतरविला; पण प्रकिया पूर्ण केली नाही, त्यांची काय अवस्था असेल? याचा तर विचारच न केलेलाच बरा, असे शेतकरी म्हणत आहेत. एकट्या लोणी गावातील 36 लोकांनी विमा उतरविला होता. यापैकी 8 लोकांनी प्रक्रिया पूर्ण केली.

त्यांना अद्यापही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आंबेगावचे तालुका कृषी अधिकारी यांना नियमानुसार निवेदन देण्यात आले आहे. यानंतरही न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यापूर्वी तालुक्यातील सर्व पीक विमा उतरविलेल्या शेतकरी बांधवांना या आंदोलनात सहभागी करून घेणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच उद्धव लंके यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT