पाटस; पुढारी वृत्तसेवा: गेले तीन हंगाम बंद असलेला पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखाना यंदा सुरू होणार आहे. त्यामुळे कामगार, मजूर, शेतकरी, सभासदांची कारखान्यावर वर्दळ वाढू लागली आहे. त्याचा फायदा पाटस परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायांना होऊ लागला आहे. परिसरातील व्यवसायांना कारखाना सुरू होणार असल्याने ऊर्जितावस्था येणार आहे.
भीमा सहकारी साखर कारखाना मागील तीन वर्षांपासून बंद आहे. यंदाच्या गाळप हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे कामगार कारखान्यावर येऊ लागले आहेत. याचा फायदा गावातील व्यावसायिकांना होऊ लागला आहे. येथील अहिल्यादेवी होळकर चौकातील कारखाना रोडवरील हॉटेल, चिकन, मच्छी मार्केट, चहाची दुकाने, कापडे, सलून, किराणामाल, मोबाईलदुरुस्ती, इलेक्ट्रिक वस्तू आदी छोट्या-मोठ्या व्यवसायांना कारखाना सुरू होणार असल्याने पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत.
कारखान्याचा चालू हंगाम सुरू करण्यासाठी तालुक्यातील कामगार कारखानास्थळावर येऊ लागले आहेत. कामगार, शेतकरी यांची कारखान्यावर ये-जा वाढल्याचा फायदा व्यावसायिकांना होऊ लागला आहे. तालुक्यातील कामगार पाटस गावात येऊ लागल्याने गावातील चौकाचौकांत गर्दीचे वातावरण पाहावयास मिळत आहे. कारखानास्थळावर पुन्हा पहिल्यासारखे चित्र निर्माण होऊ लागले आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.