तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : दहिवडी (ता. शिरूर) येथे दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पाच ते सहा एकर उसाला आग लावली. या घटनेत सुमारे तीन एकर ऊस जळून खाक झाला आहे. लक्ष्मण मुळीक, सोनबा मांजरे, सीताराम मांजरे, माणिक चव्हाण, रोहिदास दौंडकर व रामभाऊ दौंडकर या शेतकर्यांचा ऊस अज्ञात व्यक्तीने दुपारी काही वेळाच्या अंतराने पेटवून दिला.
शेतकरी अनिल दौंडकर व पोलिस पाटील जालिंदर पवार यांनी पोलिसांना याबाबत कळविले. घटनास्थळी पोलिस हवालदार अमोल चव्हाण यांनी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ व तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. दरम्यान यामध्ये तीन एकर ऊस जळून खाक झाला. ऊस पिकाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.