वर्षा कांबळे :
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी- चिंचवड शहरादरम्यान आकुर्डी, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी व दापोडी ही रेल्वे स्थानके आहेत. या चारही रेल्वे स्थानकांवर नव्याने काही सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र, सद्यःपरिस्थितीत सुविधांचा बोजवारा उडालेला दिसून
येत आहे. पुणे ते लोणावळादरम्यान कान्हे स्टेशनचा अपवाद सोडल्यास सर्व स्थानके ही इंग्रज राजवटीतील आहेत. सध्य परिस्थितीत रेल्वे स्थानकांची रंगरंगोटी, फलाटांची उंची व लांबी वाढविण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची नव्याने सुविधा देण्यात आली आहे; मात्र काही स्थानकांवरील सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
यामध्ये पिंपरी रेल्वे स्थानकाच्या भिंतीचे सुशोभिकरण करण्यात आले होतेे; मात्र, दोन ते चार वर्षांनंतर आता रंगरंगोटी खराब झाली आहे. तसेच रेल्वे स्थानकावर पुरेशी स्वच्छता नाही. पिण्याच्या व्यवस्थेजवळ पाणी गळत आहे. त्यामुळे पाणी प्लॅटफॉर्मवर साचून घाण झाली आहे. या स्टेशन परिसरात भिकार्यांचा वावर असल्याने ठिकठिकाणी घाण साचून दुर्गंधी पसरते. चिंचवड रेल्वे स्थानक हे मध्यवर्ती स्थानक समजले जाते. याठिकाणी बहुतांश एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा असतो. तसेच आरक्षणासाठी याठिकाणी गर्दी असते. रेल्वेस्थानकाजवळ नो पार्किंगमध्ये वाहने लावली जातात. त्यामुळे प्रवाशांना अडथळा होतो.
आकुर्डी रेल्वे स्थानक हे सर्वात स्वच्छ असे रेल्वे स्थानक समजले जाते. याठिकाणी स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. अपंगांसाठीचे स्वच्छतागृह बंद आहे. रेल्वे स्थानकास स्टेशन मास्तरच नाही. त्यामुळे या स्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असून, तिकीट घर आणि जवळच असलेल्या कार्यालयाभोवती गवत वाढले आहे; तसेच कचरा तसाच पडून आहे. पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही. केबल उघड्या पडल्या आहेत. कासारवाडी रेल्वे स्थानकावरील कार्यालयाला स्टेशन मास्तरच नाही. एका ठिकाणी कार्यालय, स्वच्छतागृह आणि स्टोअर रुम आहे. छोट्याशा खोलीत कित्येक वर्षापासून हे कार्यालय आहे.
बसण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. स्थानकावर सिमेंट ब्लॉक पडून आहेत. लोखंडी खिळे तसेच पडून आहेत. प्रवेशव्दारासमोरच रिक्षांचा अडथळा आहे. याठिकाणीदेखील स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. या स्थानकावर प्रवाशांची फार गर्दी नसते. तसेच एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा नसल्यामुळे कार्यालय आणि कर्मचारी सुविधांकडे दुर्लक्ष झालेले आहे. दापोडी रेल्वे स्थानकावरदेखील पार्किंगची सुविधा नसल्याने वाहने अस्ताव्यस्तपणे उभी केली जातात.