पुणे

वडगाव काशिंबेगला बैलगाडा शर्यत, गणेश फेस्टिव्हलनिमित्त 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान आयोजन

अमृता चौगुले

पारगाव, पुढारी वृत्तसेवा: गणेश फेस्टिव्हल 2022 निमित्त श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या बैलगाडामालकांना 3 लाख 53 हजार रुपये रोख, सहा मोटारसायकली, 21 जुंपते बैलगाडे व तीन सोन्याच्या अंगठ्या अशी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. यासाठी रविवारी (दि. 28) नावनोंदणी होणार आहे.

श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथील श्री स्वयंभू मोरया अर्धपीठ गणपती देवस्थान तीर्थक्षेत्रात गणेशोत्सवात गणेश फेस्टिवल 2022 साजरा केला जातो. यानिमित्त मागील 17 वर्षांपासून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे दोन वर्ष शर्यतीत खंड पडला. त्यानंतर यावर्षी भव्य स्वरूपात शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा भरणार आहे. शुक्रवार (दि. 2) ते रविवार (दि. 4 सप्टेंबर) यादरम्यान शर्यतीचा थरार रंगणार आहे. विजेत्या बैलगाडा मालकांना प्रथम क्रमांकासाठी 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस आहे. तीन दिवस फळीफोडसाठी प्रत्येकी एक मोटारसायकल दिली जाणार आहे. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख 1 हजार रुपयाचे बक्षीस आहे. फळीफोड करणार्‍या बैलगाड्यांना जुपते बैलगाडे, तृतीय क्रमांकासाठी 61 हजार, चतुर्थ क्रमांकासाठी 41 हजार रुपये तर फळीफोडसाठी जुंपते बैलगाडे बक्षीस दिले जाणार आहे.

प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची फायनल शर्यत होणार आहे. फायनल शर्यतीत तीन दिवस विजेत्या होणार्‍या बैलगाड्यांना तीन मोटारसायकली, तीन सोन्याच्या अंगठ्या व तीन जुंपते बैलगाडे बक्षीस दिले जाणार आहेत. सतत तीन वर्ष प्रथम क्रमांकात विजयी होणार्‍या बैलगाड्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. बैलगाडा शर्यतीची नावनोंदणी रविवारी (दि. 28 ऑगस्ट) सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत श्रीराम मंदिर वडगाव काशिंबेग येथे होणार आहे. बैलगाडा मालकांनी शर्यतीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT