न्हावरे (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : न्हावरे- निर्वी, येथील रस्त्यावर पिकअपने ऊसतोड मजुराच्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने बैल ठार झाला, तर एक बैल गंभीर जखमी झाला. याबाबत पिकअप चालकावर न्हावरे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गोपीनाथ चव्हाण यांनी दिली. अपघातात ऊसतोड मजूर देवराव कीर्तने (वय-22, रा. माथेवाडी, ता. पाथर्डी) यांचे नुकसान झाले.
पिकअप चालक देवीदास पठवे (वय-22, रा. बहीरवाडी, ता. अकोले,अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (दि.19) सकाळी देवराव कीर्तने हे न्हावरे येथील घोडगंगगा साखर कारखानावरून ऊसतोडणीसाठी आपल्या बैलगाडीने निघाले असताना निर्वी- न्हावरे रस्त्यावर निर्वीकडून भरधाव वेगात आलेल्या पिकअपने कीर्तने यांच्या बैलगाडीला धडक दिली. घटनेत एक बैल ठार, तर एक बैल जखमी झाला. घटनास्थळाला पोलिस उपनिरीक्षक विक्रम जाधव यांनी व न्हावरे पोलिसांनी त्वरित भेट देऊन तपास सुरू केला.