संतोष शिंदे :
पिंपरी : मागील काही महिन्यांपासून हिंजवडीसह, वाकड, थेरगावच्या काही भागात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कूपनलिका आटल्याने पीजी (पेईंग गेस्ट) ठेवणारे मालक विकतचे पाणी घेऊन भाडेकरूंची तहान भागवत आहे. ज्यामुळे त्यांचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. हिंजवडी आयटी हब आणि वाकड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची महाविद्यालये असल्याने परिसरात 'पीजीं'चा सुळसुळाट आहे. गुंठाभर जमिनीत अनेक टोलेजंग इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीतील खोल्या कॉट बेसेसवर देऊन दरमहा लाखो रुपये कमावले जातात. एका खोलीमध्ये जागेनुसार दोन ते पाचपर्यंत कॉट ठेवल्या जातात. एका कॉटसाठी अडीच ते पाच हजारापर्यंत भाडे आकारले जाते.
पीजीच्या बहुतांश इमारती गावाबाहेर उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी महापालिका किंवा ग्रामपंचायतच्या सुविधा अद्यापही पोहचल्या नाहीत. त्यामुळे पाण्यासाठी 'पीजी' मालकांना कूपनलिकेवरच अवलंबून राहावे लागते. मात्र, मागील काही महिन्यांपासून या कूपनलिकादेखील आटल्याने पीजीमालकांची मोठी धांदल उडाल्याचे चित्र आहे. भाडेकरूंची ओरड होऊ लागल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यासाठी दररोज हजार ते बाराशे इतका भुर्दंड पीजी मालकांना सोसावा लागत आहे. या वाढीव खर्चामुळे पीजीमालकांचे काही महिन्यांपासून आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे 'पीजी' ठेवणारे मालक पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.