मंचर : शेवग्याच्या शेंगा तोडण्याच्या कारणावरून तसेच जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलांनी भावाला मारहाण करत त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना महाळुंगे पडवळ येथे बुधवारी (दि. २६) सकाळी घडली. चंद्रकांत सदाशिव चासकर (वय ६९, रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे.
याप्रकरणी चंद्रकांत यांचे भाऊ सुभाष सदाशिव चासकर, सुभाष यांची पत्नी मंदा, मुलगे सचिन आणि नितीन उर्फ दत्ता चासकर यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आहे. मयत चंद्रकांत चासकर यांचा मुलगा किरण चंद्रकांत चासकर यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी दिली.
महाळुंगे पडवळ येथील चंद्रकांत चासकर व सुभाष चासकर यांच्या सामायिक शेत जमिनीची वाटणी अद्याप झालेली नाही. या शेतजमिनीवरून चंद्रकांत चासकर व त्यांचा भाऊ सुभाष चासकर यांच्यामध्ये वाद सुरू होता. मंगळवारी (दि. २५) सायंकाळी चंद्रकांत चासकर, पत्नी नंदा चासकर, सून रूपाली चासकर तसेच किरण चासकर हे शेतातील शेवग्याच्या शेंगा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुभाष चासकर याने शिवीगाळ, दमदाटी करत रूपाली चासकर यांच्या हातातील शेवग्याच्या शेंगा ओढून घेतल्या. किरण चासकर यांनी विचारणा केली असता पुण्यावरून मुलांना बोलावून घेऊन तुमच्याकडे बघतो, अशी धमकी सुभाष चासकर याने दिली.
त्यानंतर बुधवारी (दि. २६) सकाळी ८ वाजता चंद्रकांत चासकर यांच्या घरासमोर त्यांचे भाऊ सुभाष, त्यांची पत्नी मंदा, मुलगे सचिन आणि नितीन हे सर्वजण आले. शिवीगाळ, दमदाटी करून त्यांनी चंद्रकांत चासकर यांना धक्का देऊन जमिनीवर पाडले. त्यानंतर चौघांनीही त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सुभाष हे चंद्रकांत यांच्या छातीवर बसून त्यांना ठोसे मारत होते. त्यावेळी मंदा यांनी पाय धरले होते, तर सचिन व नितीन हे लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत होते. वडिलांना वाचवण्यासाठी किरण पुढे आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी होऊन चंद्रकांत चासकर हे बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
यासंदर्भात किरण चासकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुभाष चासकर, मंदा चासकर, सचिन चासकर, नितीन उर्फ दत्ता चासकर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली.