पुणे

सरसकट प्रतिनियुक्ती भोवली; संचालक महेश वरुडकरांची उचलबांगडी

Laxman Dhenge

पुणे : समुपदेशन बदली धोरणात कर्मचार्‍यांच्या प्राधान्यांकडे दुर्लक्ष करणे, उसनवार तत्वावरील सेवेतील अनियमितता झाल्याचे आरोप राज्य कामगार विमा योजनेचे (ईएसआयसी) तत्कालीन संचालक (प्रशासन) महेश वरुडकर यांना भोवले असून, त्याची राज्य शासनाने तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्याची चर्चा योजनेच्या कर्मचार्‍यांमध्ये आहे.

'राज्य कामगार विमा योजनेत प्रतिनियुक्तीचा खेळ!' या शीर्षकाखाली दै. 'पुढारी'ने 27 ऑक्टोबर 2023 रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर जम्बो बदल्यांमधील आणि सरसकट प्रतिनियुक्तीचा सावळागोंधळ संपूर्ण योजनेत चर्चेचा विषय ठरला होता. वरुडकर हे उपसचिव दर्जाचे अधिकारी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची प्रतिनियुक्ती राज्य कामगार योजनेत संचालक (प्रशासन) म्हणून करण्यात आली होती. परंतु, योजनेत त्यांच्या कारकिर्दीत अनागोंदी कारभार झाल्याचे आरोप कर्मचार्‍यांनी केले होते.

मे 2023 मध्ये बदली प्रक्रियेत पारदर्शक राहण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या 2018 च्या शासन निर्णयानुसार योजनेत समुपदेशन धोरण राबवले. त्यानुसार 23 मे 2023 रोजी परिसेविका, वरिष्ठ सहायक, कार्यालय अधीक्षकांसह विविध पदांवरील 342 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात अनेकांचा प्राधान्यक्रम डावलला. अडीअडचणींचा अजिबात विचार केला गेला नसल्याचे आरोप अनेक कर्मचार्‍यांकडून झाले. याबाबत अनेकांनी विनंती करूनही वरुडकर यांनी दखल घेतली नाही. परिणामी, त्यांच्याबद्दल अनेक कर्मचार्‍यांमध्ये नाराजीची भावना होती.

निम्मे कर्मचारी पुन्हा मूळ जागी

वरुडकर यांच्या स्वाक्षरीने झालेल्या जम्बो बदल्यांना काही दिवस लोटत नाही तोच पुन्हा सरसकट प्रतिनियुक्ती खेळ सुरू झाला. आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार वरुडकर यांच्याकडे आल्यानंतर तर बदली झालेले निम्मे कर्मचारी पुन्हा मूळ जागी परतले. उसनवारी तत्त्वावरील सेवेचा आधार घेत वरुडकरांनी ही पळवाट शोधल्याचे आरोप योजनेतील कर्मचार्‍यांनी केले होते. दरम्यान, कामगार विमा योजनेच्या आयुक्तालयातील एक वरिष्ठ कर्मचारी चर्चेत राहिला. याबाबत 'त्यांचा' बोभाटा झाल्यानंतर योजनेतील गैरप्रकाराची शासनस्तरावर तत्काळ दखल घेण्यात आली. त्यातूनच वरुडकर यांची डिसेंबरअखेर उचलबांगडी करून त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याची चर्चा आहे.

राज्य कामगार विमा

योजनेतील बदली धोरणात प्राधान्यांकडे केले दुर्लक्ष
सरसकट प्रतिनियुक्तीचा अनागोंदी कारभार भोवला

संचालकांचा अतिरिक्त कार्यभार डॉ. शशी कोळनूरकर यांच्याकडे…

सध्या संचालक (प्रशासन ) पदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय उपसंचालक डॉ.शशी कोळनूरकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. आता या सर्व प्रकरणात वरुडकर यांच्या संपर्कातील कामगार योजनेतील अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता मंत्रालयातील सूत्रांनी व्यक्त केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT