पुणे; पुढारी वृत्तसेवा : एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यातील एका महिला सहायक पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. हर्षदा बाळासाहेब दगडे असे ह्या महिला अधिकार्याचे नाव आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
दाखल असलेल्या गुन्ह्यातील चार्जशीटमध्ये मदत करून आरोपीचे आई-वडील व बहीण यांना अटक न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी दगडे यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात भ—ष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे. दगडे ह्या कोंढवा पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांच्याकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या एका गुन्ह्याचा तपास होता.
त्या गुन्ह्यातील आरोपीला चार्जशीटमध्ये मदत करण्यासाठी व त्याच्या इतर नातेवाइकांना अटक न करण्यासाठी दगडे यांनी त्याच्याकडे लाचेची मागणी केली होती. संबंधित व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर पडताळणीनंतर दगडे यांच्याविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे दगडे यांनी केलेले वर्तन हे बेजबाबदार, बेफिकीर, नैतिक अधःपतनाचे असल्याने त्यांना पोलिस आयुक्त गुप्तांनी खात्यातून निलंबित केले आहे.