पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : जात प्रमाणपत्र देण्यासाठी चार हजारांची लाच घेणार्या कर्मचार्याला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरी सुविधा केंद्र, निगडी येथे ही कारवाई केली. शैलेश अकांबरी बासुतकर (वय 41) , असे अटक करण्यात आलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शैलेश बासुतकर हा नागरी सुविधा केंद्र, निगडी येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर आहे. दरम्यान, तक्रादार महिलेने नागरी सुविधा केंद्रात त्यांच्या दोन लहान बहिणींचा जातीचा दाखला मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, अर्जावर कार्यवाही करून जातीचा दाखला देण्यासाठी आरोपी शैलेश वासुतकर यांनी त्यांच्याकडे चार हजारांची लाच मागितली.
याबाबत महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, लाचलुचपत विभागाने सापळा रचून शैलेश वासुतकर याला लाच घेताना रंगेहात पकडले. पोलिस निरीक्षक संदीप वर्हाडे तपास करीत आहेत.