पुणे : बदलती जीवनशैली आणि कोरोना संसर्गानंतर तरुणांमध्ये उच्च रक्तदाब (बीपी) आणि मधुमेह (शुगर) आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महापालिका या दोन आजारांवरील जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून अनेक आजारांवर उपचार करण्यात येतात.
नागरिकांना या योजनेचा थेट फायदा होतो. मात्र, असांसर्गिक आजारांमधील उच्च रक्तदाब आणि मधुमेह असे आजार असणार्या रुग्णांची संख्या कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काही ठिकाणी तर एका घरात तीन ते चार रुग्ण आढळतात. काहींना आनुवंशिक मधुमेह असतो, त्यामुळे महिन्याला मोठा खर्च औैषधांवर होतो. अनेक राज्यांमध्ये अशा प्रकारच्या असांसर्गिक रोगांवरील औषधे मोफत देण्यात येतात. याच धर्तीवर पुणे पालिकेने सुध्दा आता उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांच्यावरील औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानातून 45 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, महापालिका देखील यासाठी निधीची तरतूद करणार आहे.
महापालिका यावर्षीपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबावरील जेनेरिक औषधे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देणार आहे. यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबासाठी 6 प्रकारची औषधे असणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीला पाठविला आहे.
– डॉ. संजय वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका