साहेबराव लोखंडे
आंबेगाव-शिरूर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या परीने शक्तिप्रदर्शन आणि प्रचार करत आहेत. अनेक उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी खरी लढत ही प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्येच होणार, हे निश्चित मानले जात आहे. मात्र, दोन्हीही पक्षांचे लक्ष हे शिरूरमधील 42 गावांवर लागले आहे.
आजी-माजी खासदार, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानून कामाला सुरुवात केली आहे. यादरम्यान जनमानसात कधीही न दिसणारे नेतेही आपला आवाज मतदारांना ऐकविण्याच्या तयारीत आहेत. एरवी लोकांमध्ये स्वतःचा रुबाब गाजविणारे नेते आता मात्र घर-घर पिंजून हात जोडत आहेत. कधीही गाडीच्या काचा खाली न घेणारे नेते गाडीतून डोके वर काढून हातवारे करून आम्ही आपल्या अगदी जवळचे असल्याचे भासवत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या निवडणुकीच्या फॉर्म दाखल करण्याआधी मंचर येथील दोन्हीही उमेदवारांच्या सभांना शिरूरमधील 42 गावांतून मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.
शिरूर भागातील राष्ट्रवादीचे राजेंद्र गावडे, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार यांनी वळसे पाटील यांना; तर दामूशेठ घोडे, शेखर पाचुंदकर आणि शंकर जांभळकर यांनी देवदत्त निकम यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हे सर्व कार्यकर्ते मूळचे राष्ट्रवादी पक्षाचे असले, तरी केवळ जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी म्हणून प्रत्येक जण स्वतःचे शक्तिप्रदर्शन दाखविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याची चर्चा मतदारांतून होत आहे.
यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांना या 42 गावांतील 3 जिल्हा परिषद गटांतून नेहमीच मतांची आघाडी मिळाली. मात्र, पक्षफुटीनंतर त्यांचे खंदे समर्थक समजले जाणारे टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातील दामूशेठ घोडे, रांजणगाव जिल्हा परिषद गटातील शेखर पाचुंदकर आणि पाबळ जिल्हा परिषद गटातील शंकर जांभळकर यांनी शरद पवार गटाचा मार्ग धरत निकम यांच्या सभेसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे सर्वांचेच लक्ष हे शिरूरमधील या 42 गावांकडे लागले आहे.