पुणे

‘ससून’मधील दोन्ही डॉक्टर निलंबित; अधिष्ठाता डॉ. काळेही सक्तीच्या रजेवर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना कचर्‍यात फेकून अहवालात फेरफार केल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आण सफाई कामगार अतुल घटकांबळे या तिन्ही आरोपींना निलंबित करण्यात आले, तर रक्त बदलल्याचे प्रकरण गांभीर्याने न हाताळल्याबद्दल ससूनचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. राज्य शासनाने बुधवारी याबाबतचे आदेश काढले.

ससून रुग्णालयात गेल्या दोन वर्षांमध्ये किडनीतस्करी प्रकरण, ड्रग प्रकरणातील आरोपी ललित पाटीलचे पलायन, उंदीर चावल्यामुळे आयसीयूमध्ये रुग्णाचा मृत्यू अशा गंभीर घटना घडल्यानंतरही ससून प्रशासनाकडून कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यानंतर अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्ताचा नमुना परस्पर बदलल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली. समितीचा अहवाल 24 तासांत मिळाल्यावर तातडीने ससूनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.

राज्य शासनाने डॉ. अजय तावरेसह आपत्कालीन विभागाचा वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर तसेच सफाई कामगार अतुल घटकांबळे या तिघांना निलंबित केल्याचे लेखी पत्र ससून रुग्णालयातर्फे काढण्यात आले आहे. निलंबन आदेश कायम असेपर्यंत डॉ. तावरे आणि डॉ. हारनोळ यांना कोणतीही खासगी नोकरी स्वीकारता येणार नाही किंवा उद्योग सुरू करता येणार नाही, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मात्र, निलंबन आदेश अमलात असेपर्यंत डॉ. तावरेला जामीन मिळाल्यास त्याची नेमणूक कोठे करण्यात येईल, याबाबत स्पष्टोक्ती देण्यात आलेली नाही.

महिला डॉक्टरांची चौकशी

ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हरनोल, शिपाई अतुल घटकांबळे यांनी पैसे घेऊन रक्ताचे नमुने बदलत चुकीचे अहवाल दिले होते, त्याच फॉरेन्सिक विभागात सहकारी महिला डॉक्टरांची चौकशी बुधवारी सायंकाळी करण्यात आली. त्यांच्या चौकशीत अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या संशयास्पद हालचालींबाबत विचारणा करण्यात आली.

डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शिफारशीनुसार डॉ. काळे यांनी रक्तनमुना फेरफार प्रकरणावर नियंत्रण ठेवले नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून, ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

  • कल्याणीनगर अपघात प्रकरणातील घडामोडी…जबाबदारी झटकली आणि डॉ. विनायक काळे पळाले!
  • बाल न्याय मंडळातील शासननियुक्त सदस्य चौकशीच्या फेर्‍यात
  • दोषींना पाठीशी घालणार नाही : हसन मुश्रीफ
  • मुख्यमंत्री घेताहेत कल्याणीनगर अपघात प्रकरणात अपडेट
  • बिल्डर विशाल अगरवालसह पाच जणांचा जामीन लांबणीवर
  • अपघातग्रस्त पोर्शे गाडीची तात्पुरती नोंदणीही रद्द
  • 'त्या' चौघांचा युद्धपातळीवर शोध सुरू

हेही वाचा

SCROLL FOR NEXT