डीएनएसह शारीरिक सक्षमतेची होणार तपासणी; आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी file photo
पुणे

Bopdev Ghat Case: डीएनएसह शारीरिक सक्षमतेची होणार तपासणी; आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी

मागील साडेसहा महिन्यांपासून कोणाकडे घेतला आश्रय, याची होणार चौकशी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी बाप्या ऊर्फ सोमनाथ ऊर्फ सूरज दशरथ गोसावीच्या शारीरिक सक्षमतेची तपासणी केली जाणार असून, डीएनए चाचणीसाठी रक्त, नखे, केस आदी नमुने घेतले जाणार आहेत.

मागील साडेसहा महिन्यांपासून फरार असताना तो कोणाकडे राहात होता, त्याला कोणी आश्रय दिला, याबाबतही चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी लष्कर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. अतकरे यांनी आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बोपदेव घाटात मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना तीन ऑक्टोबरच्या रात्री घडली होती. पुण्यासह देशभरात खळबळ उडवून देणार्‍या या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपी बाप्या ऊर्फ सोमनाथ ऊर्फ सूरज दशरथ गोसावी (वय 33, रा. दीपनगर, काटेवाडी, बारामती) याला पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी शनिवारी अकलूज परिसरातून ताब्यात घेतले.

त्याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील प्रियंका वेंगुर्लेकर यांनी केली. गोसावी व त्याच्या साथीदारांनी मानवी जिवाला काळीमा फासणारे घृणास्पद कृत्य केले आहे. आरोपीने गुन्हा करण्यासाठी वापरलेले हत्यार, लुटलेले दागिने, गुन्हा करताना घातलेले कपडे जप्त करायचे आहेत. आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची आहे, तसेच त्याने साथीदारांसोबत हा गुन्हा कसा केला, याबाबत चौकशी करायची आहे, असे तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.

या प्रकरणात गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोएब अख्तर ऊर्फ शोएब बाबू शेख (वय 27, रा. आदर्शनगर, मंतरवाडी) आणि चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय 20, रा. होलेवस्ती, उंड्री) यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली होती. मात्र, गोसावी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर साडेसहा महिन्यांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT