गणेश खळदकर
पुणे : अभियांत्रिकी पदवीधरांकडे अपेक्षित कौशल्यगुण नसल्याची ओरड उद्योगजगताकडून होत असते. परंतु, शैक्षणिक संस्था आता विद्यार्थ्यांच्या कौशल्यवाढीवर भर देत आहेत. यातूनच विद्यार्थ्यांसाठी पुस्तकी ज्ञानापेक्षा वर्गाबाहेरच्या शिक्षणावर भर दिला जात असून, देशपातळीवरील विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना संधी निर्माण होत आहे. त्यामुळे कौशल्याधिष्ठित इंजिनिअर तयार होणार असल्याची माहिती अभियांत्रिकी तज्ज्ञांनी दिली आहे.
अभियांत्रिकी पदवीधरांमध्ये कौशल्य वाढावे, यासाठी एसएई इंडियातर्फे आयोजित 'बाहा' ही स्पर्धा 2007 पासून आयोजित केली जाते आणि ही विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्सची दुसरी महत्त्वपूर्ण स्पर्धा म्हणजे सुप्रा-एसएई इंडिया. यात संघाला फॉर्म्युला रेसिंग कारच्या धर्तीवर ओपन व्हील कार बनविण्याचे आव्हान असते. शिक्षण मंत्रालयाच्या नवोपक्रम विभागातर्फे आयोजित हॅक्योथॉन स्पर्धेत रोजच्या वापरातल्या समस्या असतात. दी आयईटीची प्रेझेंट अराउंड द वर्ल्ड ही स्पर्धा सादरीकरण या कौशल्यांवर आधारित असते.
या संस्था उपक्रम राबवितात
इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग अँड टेकनॉलॉजी, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स इंडिया, सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया, इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफि—जरेशन अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स, इंडियन केमिकल सोसायटी, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन इत्यादी संस्था देशपातळीवर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहेत.
आत्मसात केली जाणारी कौशल्ये
नवकल्पना आणि नवोपक्रम, संघभावना आणि संघनेतृत्व
वेगवेगळ्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून आलेल्या सहकार्यांसोबत काम करण्याची क्षमता.
व्यावसायिक कौशल्ये, अपयश पचविण्याची क्षमता आणि त्यातून शिकण्याची वृत्ती, निर्णयक्षमता
वेळेचे अचूक नियोजन आणि वापर, प्रकल्पसंचालन, आर्थिक नियोजन
अभ्यासक्रमपूरक विविध तांत्रिक स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. वेळेचा आणि संसाधनाचा योग्य विनियोग, आर्थिक नियोजन या बाबींबरोबर नेतृत्वगुणांचा विकासही होतो. संघात काम केल्याने संघभावना वाढीस लागते.
– प्रा. डॉ. गणेश काकांडीकर, प्राध्यापक
तथा संकुलप्रमुख, यंत्र अभियांत्रिकी, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे
व्यावसायिक संस्थांच्या स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नांची उकल करणे, विचारमंथनाने अनेक उपायांमधून योग्य उपाय शोधणे, त्याची योग्यता पटवून देणे, याचे ज्ञान मिळते. तसेच, या स्पर्धांमधून उद्योगाशी संबंधित प्रश्न हाताळले जात असल्याने कामाचा अनुभवही मिळतो.
– प्रा. डॉ. आदित्य अभ्यंकर,
प्रमुख, स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ