पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदाही गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांचा निनाद ऐकायला मिळणार आहे. ढोल-ताशा निर्मिती करणार्या व्यावसायिकांनीही महिनाभरापूर्वीच तयारी सुरू केली आहे. नव्या ढोल-ताशांच्या खरेदीसाठीही बुकिंगला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या साथीमुळे हा व्यवसाय आर्थिक नुकसानीत होता. पण, अडीच वर्षांनंतर यंदा ढोल-ताशांच्या व्यवसायाला चांगला प्रतिसाद आहे. अमेरिकेपासून ते यूकेपर्यंत… नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत… ढोल-ताशांची मागणी आहे.
गणेशोत्सव जवळ आल्यावर ढोल-ताशांच्या निर्मितीसाठी लागणार्या पानांची जुळवाजुळव व्यावसायिक करीत असतात. काहींचा हा पिढीजात व्यवसाय आहे. पुण्यातून देशभर ढोल-ताशांची पाने आणि पिंपांसह पूर्णपणे तयार असलेल्या ढोल-ताशाला मागणी असते. गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांकडून याला महिन्यापूर्वीच मागणी सुरू होते. कोरोना काळात या व्यवसायाला उतरती कळा आली होती. पण, यंदाच्या वर्षी दीड महिन्यापूर्वीच ठिकठिकाणाहून नवीन ढोल-ताशाला मागणी सुरू झाली आहे. कारागीरही ढोल-ताशांच्या निर्मितीत व्यग्र असून, यंदा ढोल-ताशांच्या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत.
व्यावसायिक प्रभाकर केंदूरकर म्हणाले, 'आमची चौथी पिढी या व्यवसायात काम करीत आहे. आम्ही ढोल-ताशा निर्मितीसाठी लागणारी पाने पुरवितो. त्यानंतर कारागिरांकडून ढोल-ताशा पानांची आणि पिंपाची जोड करून ढोल-ताशे बनवून घेतले जातात. वर्षभर हा व्यवसाय सुरूच असतो. पण, गणेशोत्सवात मागणी वाढते. यंदा ढोल-ताशांची मागणी सुरू झाली असून, कारागीरही कामाला लागले आहेत. 15 ते 27 इंचापर्यंतचे ढोल आम्ही तयार करून देत आहोत. कोरोनामुळे व्यवसाय आर्थिक नुकसानीत होता. पण, आता व्यवसायाला चांगला प्रतिसाद आहे. जुन्या ढोल-ताशांच्या दुरुस्तीला अजूनही सुरुवात झालेली नाही. ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू झाल्यानंतर त्याची सुरुवात होईल.'