पुरंदर विमानतळ परिसर Pudhari
पुणे

Pune News : पुरंदर विमानतळ परिसरात जमीन विक्रीचे बोगस रॅकेट

Purandar Airport : शासकीय यंत्रणा दलालांच्या मुठीत? बनावट वारस तयार

दिगंबर दराडे

Purandar Airport land scam

पुणे : पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. मागील काही महिन्यांपासून या ठिकाणी विमानतळ परिसरातील गावांत बोगस दस्तनोंदणीचे प्रकार उघडकीस आले आहेत. वकील, एजंट आणि बनावट वारसदारांचा सुळसुळाट झाला आहे.

पुरंदर तालुक्यात बोगस सातबारांची शासनदरबारी नोंद कशी होते? याचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे. बनावट कागदपत्रांव्दारे नव्या खरेदीदाराचे नाव सातबारा उतार्‍यावर लावण्याचे प्रताप दलालांनी शासकीय यंत्रणा हाताशी धरून केल्याचे उजेडात आले आहे. पुरंदर तालुक्यातील विमानतळ होत असलेल्या गावांत हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.

कमी किमतीत भूखंड विकत घेण्याच्या ऑफर्स गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दिल्या जात आहेत. 10 लाखांपासून ते करोडो रुपयांपर्यंत भूखंडाची ऑफर दिल्याने नवीन गुंतवणूकदार त्यात फसत आहेत. चक्क शासकीय अधिकार्‍यालाच फसविण्याचा प्रकार पुरंदर तालुक्यात घडल्याचे वास्तव समोर आले आहे. कमी किमतीत खरेदीदारांना भूखंड देऊन त्यांची फसवणूक केली जात आहे. गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

बहुप्रतीक्षित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला पुन्हा गती मिळाल्याने या भागातील जमिनींच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रकल्पासाठी निर्धारित करण्यात आलेल्या परिसरातील जमिनींना सध्या विक्रीसाठी मोठी मागणी असून, स्थानिक शेतकरी आणि गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 2700 हेक्टर जमीन आवश्यक असून, सध्या जमिनी संपादन प्रक्रियेला चालना देण्यात येत आहे. महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असून, राज्य सरकारने नुकतीच यास मान्यता दिली आहे.

शासनाकडून जमिनीचा मोबदला वाढविण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे. याअंतर्गत जमिनीच्या बाजारभावाच्या चारपट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आता जमीन देण्यास सकारात्मक दिसत आहेत. स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियेपूर्वी आम्ही या प्रकल्पाला विरोध केला होता, पण, आता भरपाईचा दर आणि रोजगाराच्या संधीमुळे आम्हाला विश्वास वाटतोय, असे एक स्थानिक शेतकरी सांगतात. मात्र, काही शेतकरी अजूनही त्यांच्या जमिनी जाणार, याबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत. या विमानतळामुळे पुणे आणि महाराष्ट्रातील हवाई वाहतुकीला मोठी चालना मिळणार असून, पुरंदरसह बारामती, सासवड व आजूबाजूच्या भागांचा विकास होण्याची शक्यता आहे. औद्योगिक क्षेत्र, हॉटेल व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्रातही नवे दरवाजे उघडणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अशी होते फसवणूक...

1. बनावट 7/12 उतारे व मालकी

हक्क दाखविणे

जिथे जमीन खरोखर त्यांच्या नावे नसते, पण बनावट कागदपत्रांनी ती आपली भासवतात

2. मृत व्यक्तींच्या नावे जमीन विकणे

मृत व्यक्तीच्या नावावरील जमीन त्याच्या वारसदारांची परवानगी न घेता विकली जाते

3. एकाच जमिनीचे अनेक व्यवहार

एका जमिनीची एकाच वेळी किंवा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री केली जाते

4. सरकारी किंवा वादग्रस्त जमीन विकणे

अशी जमीन विकत घेतल्यावर खरेदीदार अडचणीत येतो, कारण ती मालकी

स्पष्ट नसते

5. बनावट खाते व बनावट वारस

तयार करणे

वारसा हक्काच्या खोट्या कागदपत्रांची निर्मिती करून जमीन विकणे

पुरंदर विमानतळ परिसरातील सात गावांमध्ये मागील काही दिवसांपासून बोगस दस्तनोंदणी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बाहेरील शहरातील नागरिक जमिनी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. या वेळी त्यांची फसवणूक होत आहे. कोणाचाही प्लॉट कोणालाही विकला जात असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. चुकीचे खरेदीखत करणार्‍या अधिकार्‍यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत.
रोहन सुरवसे पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते

काय काळजी घ्यावी...

* जमीन खरेदीपूर्वी 7/12, 8-अ, फेरफार, घरफार, सिटी सर्व्हे, प्रॉपर्टी कार्ड यांची खातरजमा करावी

* तालुका कार्यालय व महसूल विभागात कागदपत्रांची छाननी करावी

* वकिलांमार्फत टायटल क्लीअरन्स रिपोर्ट घ्यावा

* जमीन विकत घेण्याआधी अ‍ॅडव्होकेट किंवा प्रॉपर्टी कन्सल्टंटकडून सखोल चौकशी करावी

* ई-गव्हर्नन्स पोर्टल्स (जसे की महाराष्ट्राचे महाभूलेख) वरून डिजिटल नोंद तपासावी

* व्यवहार करताना नोंदणीकृत दस्तऐवज व पॅन/आधार तपशील बघावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT