पुणे : जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकच्या सुरुवातीला दरड कोसळली आणि वाहतूक ठप्प झाली. या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळातर्फे उपाययोजना करण्यात येणार आहे. परिसरातील दरडी कोसळण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुढील एक हजार वर्षांच्या पर्जन्यमानाचा अभ्यास करून नवीन सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिग लिंकची सुरक्षा सुविधा आणि डिझाईन हे शंभर वर्षांच्या पावसाच्या कमाल प्रमाणावर आधारित होते. आता मात्र, निसर्गातील बदल आणि अतिवृष्टी लक्षात घेता, आता किमान एक हजार वर्षांच्या पर्जन्यमानाचा निकष लावून नवीन सुधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार एक हजार वर्षांच्या कालावधीत एका दिवसात १ हजार २४९ मि.मी. पाऊस झाला तरी मिसिंग लिंक सुरक्षित राहणार आहे, असे रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी सांगितले.
सह्याद्री पर्वत रांगांमधील या भागातील भूगर्भीय रचना काहीशी क्लिष्ट आहे. डोंगराचा आतील भाग हा अत्यंत कठीण पाषाणाचा आहे. परंतु, वरील थर हा माती आणि ठिसूळ दगडांचा बनलेला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे हा वरील थर वाहून येतो आणि दरडी कोसळतात. ही पूर्णपणे नैसर्गिक आपत्ती असली तरी त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाने मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरडीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर
नेटिंग आणि फिक्सिंग : डोंगराच्या बाजूला जाळ्या बसवणे आणि सैल झालेले दगड फिक्स करणे.
बेंचिंग : डोंगराचे टप्पे पाडून (पायर्यांप्रमाणे) उतार सुरक्षित करणे.
पाण्याचे प्रवाह बदलणे : भविष्यात अतिवृष्टीचे पाणी थेट रस्त्यावर न येता त्याचे मार्ग बदलण्याची योजना आखली आहे.