द़ृष्टिहीन मुली गिरवताहेत ’ट्रेकिंग’चे धडे Pudhari File Photo
पुणे

Women's Day Special: द़ृष्टिहीन मुली गिरवताहेत ’ट्रेकिंग’चे धडे

अवघड गड-किल्ल्यांवर यशस्वी भ्रमंती; पर्वती टेकडीपासून सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: ऐतिहासिक वास्तूंचा असलेला ध्यास... दुर्दम्य इच्छाशक्ती... दिसत नसूनही स्पर्शाने अनुभवणारे पराक्रम... अन् साथीदारांची मिळालेली साथ... या सर्वांच्या जोरावर पुण्यातील शैक्षणिक धडे घेत असताना दृष्टिहीन मुली मात्र दुसर्‍या बाजूला ट्रेकिंगचे धडे घेत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दिव्यझेप ग्रुपमधील या मुलींबाबत दै. ‘पुढारी’ने जाणून घेतले आहे.

अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रांत उंच भरारी घेत असताना दिसून येतात. मात्र, ज्या गड-किल्ल्यांवर डोळस व्यक्तीही व्यवस्थित किल्ला सर करू शकत नाही, अशा किल्ल्यांवर पुण्यातील द़ृष्टिहीन मुली एक नव्हे... दोन नव्हे, तर तब्बल सहा किल्ले सर करतात, ही पुण्यासाठी भूषणावह गोष्ट आहे.

स. प. महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेणार्‍या तब्बल सहा ते सात मुली गड-किल्ल्यांची भ्रमंती आणि ट्रेकिंग उत्साहाने करीत आहे. गंगा सागर, गौरी देशमुख, वैष्णवी डफळे, मुस्कान परदेशी, सोनाली, अमृता खेकरे आणि अनुष्का शिंदे या द़ृष्टिहीन विद्यार्थिनी प्रा. योगिता काळे यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्याने दिव्यझेप ग्रुपच्या माध्यमातून किल्ल्यांच्या ट्रेकिंगमध्ये हिरिरीने सहभाग घेऊन किल्ला सर करतात.

काठीच्या साहाय्याने पर्वती सर

स. प. महाविद्यालयात शिकणार्‍या या मुलींनी किल्ल्यांवर जाण्याची इच्छा प्रा. योगिता काळे यांच्याकडे व्यक्त केली. मात्र, द़ृष्टिहीन मुली आणि किल्ला चढाईसाठीची असलेली वाट बिकट असल्याने या मुलींना प्रथम पर्वती टेकडी चढाईचे धडे देण्यात आले. या मुलींच्या हातातील काठीच्या साहाय्याने आणि सूचनांच्या आधारे या मुलींनी पर्वती टेकडी सर केली.

दिव्यझेप ग्रुप नावाचा आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिंनीचा ग्रुप आम्ही चालवत आहोत. केवळ भटकंती, भ्रमंती आणि गड-किल्ले सर करणे, हा उद्देश आहे. त्यामध्ये जवळपास 20 ते 25 मुली आणि बाकी सर्व मुले असा 60 जणांचा ग्रुप आहे. त्यामध्ये या नऊ ते दहा द़ृष्टिहीन मुलीही सहभागी असतात. किल्लेचढाई, तेथील वास्तू विशेषत: पाण्याची टाकी, किल्ल्याचा दरवाजा, शिल्पे यांना स्पर्श करणे, तेथील मातीचा सुगंध अनुभवणे आदी गोष्टींसाठी या मुली खूप उत्सुक असतात. आत्तापर्यंत या मुलींनी शिवनेरी, मल्हारगड, हडपसर, सिंहगड, विचित्रगड आणि लोहगड हे किल्ले स्वतः ट्रेकिंग करीत सर केले आहेत.
- प्रा. योगिता काळे (संचालक, दिव्यझेप ग्रुप)काठीच्या साहाय्याने पर्वती सर
स. प. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अंध मुली या सह्याद्रीतील वेगवेगळ्या किल्ल्यांवर ट्रेकिंग करत आहेत. कॉलेजच्या शिक्षणासोबतच महाराष्ट्रातील गडकोट, त्यांचा इतिहास, भूगोल, जैवविधता जाणून घेण्याचा ध्यास या मुलींनी घेतला आहे. एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या किल्ल्याला भेट देऊन येते आणि त्या व्यक्तीला त्याबद्दल विचारले, तर आजूबाजूचा परिसर वगळता काही सांगता येत नाही. पण या गडावर जातो, ट्रेक करतो तेव्हा ती चढाई आम्हीही करू शकतो आणि आम्हीही शिखरमाथा गाठू शकतो, ही भावनाच आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
- उमेश झिरपे, अध्यक्ष, गार्डियन गिरिप्रेमी गिर्यारोहण इन्स्टिट्यूट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT