Bogus Spiritual Guru Pudhari
पुणे

Black Magic Fraud: मूल होण्याच्या नावाखाली फसवणूक; पेढ्यातून अंगारा खाण्यास देऊन लावला 3 लाखांचा चुना, भोंदूबाबाला बेड्या

तीन लाखांचा अपहार करणार्‍या भोंदूबाबाला बेड्या

पुढारी वृत्तसेवा

पुणे : महिलेला विविध विद्या-पूजा केल्यानंतर तुला मुल होईल, असे आश्वासन देऊन अघोरी विद्या करून महिलेला पेढ्यातून अंगारा खाण्यास देऊन त्या बदल्यात पैसे व दागिने घेऊन तब्बल 3 लाख 15 हजार रुपयांचा अपहार करणार्‍या भोंदूबाबाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गिरीष बलभीम सुरवसे (36, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याबाबत एका 26 वर्षीय महिलेनी दिलेल्या तक्रारीवरून भोंदू बाबावर महाराष्ट्र नरबळी जादूटोना प्रतिबंधात्मक कायद्याच्या विविध कलमान्वये व अपहार केल्याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 28 जुलै ते 9 सप्टेंबर 2025 दरम्यान घडला. पीडित महिला ही बालाजीनगर परिसरात राहण्यास असून, तिच्या लग्नाला दोन वर्षे झाली आहेत. (Pune Latest News)

मुलबाळ होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेऊनही मुल होत नव्हते. एक दिवशी गावाकडील एका व्यक्तीने आळंदी येथील देवऋषी बाबाबद्दल माहिती दिली. मुल होईल या आशेने तिने सासरी न सांगताच त्या भोंदू बाबाकडे जाणे सुरू केले. त्याने मुल होईल, असे तिला आश्वासन देऊन अंगारा धुपारे करण्यासाठी तिच्याकडून वेळोवेळी लाखो रुपये उकळले.

तिला पेढ्यातून अंगारा खाण्यास दिला. यावरही तो थांबला नाही. त्याने तिच्याकडे पैशाची मागणी सुरूच ठेवली. महिलेने शेवटी तिच्याकडील मंगळसूत्र विकून त्या भोंदूबाबाला पैसे दिले. जेव्हा महिला घरी आली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला मंगळसूत्राबाबत विचारणा केली. तेव्हा तिने मुल होण्यासाठी अंगारा धुपार्‍याला मंगळसूत्र विकल्याचे सांगितले. सर्व फसवणुकीचा प्रकार तिच्या सासरच्यांच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दिली. याप्रकरणात आरोपीचा शोध घेऊन त्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.

या प्रकरणात भोंदूगिरी करणार्‍या आरोपीला आमच्या पथकाने अटक केली आहे. महिलेला या भोंदूबाबाकडे घेऊन जाणार्‍यालाही या प्रकरणात आम्ही आरोपी केले असून, त्यालाही या प्रकरणात लवकर अटक केली जाईल. दरम्यान, आरोपीने यापूर्वी अशा पद्धतीने किती जणांना फसविले आहे, याचाही शोध सुरू आहे.
- विठ्ठल पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहकारनगर ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT