पुणे

इंदापूर बाजार समितीतून भाजपाची माघार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (दि.3) भाजपाने निवडणूक न लढविण्याचा पवित्रा घेतल्याने विधानसभेनंतर इंदापुरात भाजपा व राष्ट्रवादीत होणार्‍या थेट लढतीकडे डोळे लावून बसलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

भाजपा नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत बाजार समिती निवडणूक न लढवण्याची पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या वेळी त्यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या संबंधित असणार्‍या सर्व संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शेतकरी हितासाठी भाजपाच्या वतीने न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले, त्यांनी बाजार समितीच्या मागील कामकाजाविषयी प्रश्नचिन्हदेखील उपस्थित केले.

पुणे जिल्हा बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी पक्षविरहित मोट बांधत निवडणुकीत पुन्हा उडी घेतली असल्याने तालुक्यात तिसरी आघाडी होऊ घातल्याचा बोलबाला सुरू झाला आहे. 20 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. जर निवडणूक लागलीच तर ती तिसरी आघाडी (आप्पासाहेब जगदाळे) गट व राष्ट्रवादी अशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी आप्पासाहेब जगदाळे यांनी तिसर्‍या आघाडीबाबत कोणतीही ठोस भूमिका अद्यापपर्यंत मांडलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस मात्र निवडणूक लढवण्याच्या पवित्र्यात असून, त्यांनी अनेक जागांवरती उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक लढविण्याविषयी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ठाम असून, अनेक दिग्गज नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी असल्याने निवडणूक बिनविरोध होण्यासाठी या कालावधीत हालचाली होऊ शकतात.

यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून पडद्यामागून हालचाली होऊ शकतात. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असल्याने भाजपाकडून त्याला टक्कर देण्यासाठी बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा सक्रिय झालेला असताना इंदापुरात मात्र भाजपा शांत राहिल्याने भाजपाची नेमकी कोणती रणनीति असणार याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या विचारातून सहकार क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवत पुणे जिल्ह्यात नाही तर तब्बल राज्यात वेगळा दरारा निर्माण केला आहे.

या बाजार समितीवर सध्याचे विसर्जित झालेले संचालक मंडळ विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,आमदार दत्तात्रय भरणे आमदार यशवंत माने व जिल्हा बँकेचे संचालक बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे होते, त्यामध्ये भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विचारांचे काही संचालक होते, मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत याच बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देत आपला राजकीय पवित्रा दाखवून दिला होता. सध्या ते पाटील यांच्यापासून दुरावल्याचेच काहीसे चित्र आहे.

वरिष्ठांच्या सूचनेचे पालन करू : दत्तात्रय भरणे
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेत्यांसह राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येईल, असे आमदार भरणे यांनी सांगितले. तर पुढील दोन दिवसात लवकरच राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करू, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT