सुहास जगताप
पुणे: ‘काँग्रेसचे निष्ठावंत’ अशी ओळख असणारे आणि बारामतीच्या पवार घराण्याशी सतत संघर्ष करणार्या थोपटे घराण्यातील भोर-वेल्हा-मुळशीचे माजी आमदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे यांना प्रवेशाची दारे उघडी करून भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याच जिल्ह्यामध्ये मोठा शह दिला आहे. भाजपच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकारण आता नव्या वळणावर आले आहे.
महायुतीमध्ये भाजपची पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्यामुळे मोठी कोंडी झाली आहे. या कोंडीवर मात करण्यासाठी भाजप पुणे जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांच्या शोधात होते. त्यामध्ये पहिल्यांदा संग्राम थोपटे हे त्यांच्या हाताशी लागले आहेत. संग्राम थोपटे यांनी अलीकडच्या काळात पवार घराण्यात फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांशी जुळवून घेतले होते.
लोकसभेला त्यांनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा प्रचार करून त्यांना सुमारे 47 हजारांचे मताधिक्य भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघात मिळवून दिले. अतिशय अडचणीच्या काळात सुप्रिया सुळे यांचा जो सहजसाध्य विजय बारामती लोकसभा मतदारसंघात झाला, त्यामध्ये थोपटे पिता-पुत्रांचा महत्त्वाचा वाटा आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला मात्र सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या वलयाचा फारसा फायदा थोपटे यांना झाला नाही. उलट लोकसभेला सुळे यांना मिळालेल्या मोठ्या मताधिक्याच्या जोशात थोपटे राहिले आणि त्यांना आपल्या घरच्या हक्काच्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला.
संग्राम थोपटे यांच्या या पराभवानंतर आणि राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर अजित पवारांनी संग्राम थोपटे यांना ‘टार्गेट’ केले. अजित पवार यांनी संग्राम थोपटे यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीकडून मिळालेले कर्ज रोखले. तसेच कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भोर, वेल्हा, मुळशी मतदारसंघांमध्ये शिंदे शिवसेनेची ताकद वाढू लागली आहे. राज्यात पक्षाची सत्ता नाही. त्यातच विधानसभेला झालेला पराभव, यामुळे संग्राम थोपटे यांची चांगलीच कोंडी झालेली दिसते.
संग्राम थोपटे यांनी यावर अचूक खेळी करत या कोंडीवर मात केली आहे. अजित पवार यांच्या निरनिराळ्या डावांना शह देण्यासाठी आता शक्तिशाली भाजपच्या सत्तेचा फायदा थोपटे यांना भाजपप्रवेशामुळे मिळू शकतो. तसेच अजित पवारांच्या विरोधातही जिल्ह्यात एक भक्कम नेतृत्व संग्राम थोपटे यांच्या रूपाने भाजपला मिळू शकते.
भाजपकडे आता दौंडचे आमदार अॅड. राहुल कुल हे शांत, संयमी, अभ्यासू नेते आहेत. पुणे जिल्ह्यातील राजकारणावर त्यांची चांगली मांड आहे. त्यांच्या जोडीला संग्राम थोपटे यांच्यासारखा आक्रमक नेता मिळाला, तर भाजपला पूर्ण जिल्ह्यामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठी मदत मिळणार आहे. ही जोडी पवारांच्या राजकारणाला भाजपच्या राजकीय ताकदीने सहज शह देऊ शकते, अशी स्थिती सध्यातरी जिल्ह्यातील राजकारणात आहे.