वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंढरपूर येथे निरा देवघरच्या पाणीवाटपाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे स्वातंत्र्यकाळापासून शेतीच्या पाण्याचे दारिद्य्र भोगलेल्या इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांच्या वाट्याला पुन्हा पाण्याचे दुर्भिक्ष पडणार की काय अशी शेतकर्यांना चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे शेतीच्या पाण्यावर तिरकी नजर ठेवणार्या भाजप सरकारबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे.
इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांनी गेल्या काही दशकांमध्ये शेतीच्या पाण्यासाठी मोठा संघर्ष केला आहे. तेव्हा कुठे जेमतेम पाणी तालुक्याच्या वाटणीला आले. 2007 मध्ये नीरा देवघर धरणाची निर्मिती झाली; मात्र त्याच्या कालव्याची कामे झाली नाहीत, त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी नीरा उजवा कालव्यास 40 टक्के तर नीरा डाव्या कालव्यास 60 टक्के प्रमाणात देण्याचा तत्कालीन सरकारचा निर्णय झाला होता.
त्याप्रमाणे 2017 पर्यंत पाणीही मिळाले; मात्र पुढे जाऊन 2018 मध्ये भाजप सरकार सत्तेत असताना उजव्या कालव्याला 60 तर डाव्या कालव्याला 40 टक्के पाणी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, 2019 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतलेल्या निर्णयानुसार डाव्या कालव्याच्या वाटणीला 5.166 टीएमसी, तर उजव्या कालव्याच्या वाटणीला 4.181 टीएमसी पाणी आले आणि तेव्हापासून आजवर त्याच पद्धतीने पाणीवाटप होत असून, या भागातील शेती सिंचन वेळेवर होत आहे.
असे असताना आता पुन्हा एकदा भाजपच्या केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी पंढरपूर येथील जाहीर सभेत बोलताना नीरा देवघर धरणातील पाणी बारामतीकरांनी पळवले असून, हे पाणी दुष्काळी पट्ट्याला समन्यायी पद्धतीने वाटप करण्यासाठी केंद्रीय स्तरावरून नव्याने सर्व्हे करून आराखडा तयार केला जाणार असल्याचे वक्तव्य केले आहे, त्यामुळे भाजप सरकार बारामतीकरांवर राजकीय सूड उगवत असले तरी यामध्ये इंदापूर तालुक्याचा बळी जाणार आहे.
कारण, नीरा डाव्या कालव्यावरील एकूण सिंचनामध्ये इंदापूर तालुक्याचा 61 टक्के वाटा आहे. त्यामुळे भाजप सरकारकडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीचा फटका सर्वच राजकीय पक्षांच्या विचाराच्या शेतकर्यांना बसत असून, नागरिकांमध्ये भाजपबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
….त्यामुळेच पाच टीएमसी पाणी मिळाले नाही
सन 2021 मध्ये माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणात येणार्या पुण्याच्या सांडपाण्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूरच्या सिंचनासाठी उचलण्यास मंजुरी घेतली होती. मात्र तेव्हाही भाजपच्याच काही अदृश्य शक्तींनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांची माथी भडकावून आंदोलने करायला लावल्यानेच तो निर्णय स्थगित करण्यात आल्याचे तालुक्यातील शेतकर्यांमध्ये बोलले जात आहे.