पुणे : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचाराला अत्यंत कमी कालावधी मिळणार असल्याने महायुतीच्या प्रत्येक घटकपक्षातील कार्यकर्त्याला या निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी करून घ्या. केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर ‘विकसित भारत’ आणि ‘विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे रात्रीचा दिवस करून विजयासाठी कामाला लागा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराचा नारळ चव्हाण यांनी शुक्रवारी पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या सभागृहात आयोजित भव्य प्रचारसभेत फोडला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतजी पाटील, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, प्रदेश संघटन सचिव राजेशजी पांडे, पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभजी गावडे, आमदार हेमंतजी रासने, आमदार राहुलजी कुल, आमदार सिद्धार्थजी शिरोळे, आमदार शंकरजी जगताप, आमदार सुनीलजी कांबळे, माजी मंत्री दिलीपजी कांबळे, जगदीशजी मुळीक, महापौर मंजुषाताई नागपुरे, सभागृह नेते गणेशजी बिडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले, पिंपरी-चिंचवडचे भाजपचे अध्यक्ष शत्रुघ्नजी काटे, नगरसेविका निवेदिताताई एकबोटे, प्रशमजी कोल्हे, भैयाजी माने यांच्यासह भाजपचे महापालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी संघटनात्मक ताकद एकवटण्यावर भर द्यावा.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप व महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांच्या शैक्षणिक अनुभवाचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले, स्मिताताईंसारखे शिक्षण क्षेत्रातील अनुभवसंपन्न नेतृत्व मतदारांसमोर मांडले पाहिजे. त्यांनी कुलगुरुस्तरावर काम केले असून त्यांचा अनुभव पदवीधरांच्या प्रश्नांसाठी उपयोगी ठरू शकतो. शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या कार्याचाही त्यांनी उल्लेख केला. प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा महत्त्वाचा असतो, असे चव्हाण म्हणाले.
प्रचाराच्या शुभारंभावेळी उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या पक्षातील नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानताना डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी शरद लाड आणि भैया माने यांचा विशेष उल्लेख केला. हे दोघे आपले भाऊच आहेत. हे दोन्ही भाऊ माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असून त्यांनी माझ्या उमेदवारीला दिलेला पाठिंबा ही जणू भाऊबीजेची भेटच आहे असे मी मानते, अशा शब्दांत डॉ. स्मिता जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. निवडणुकीत विजय मिळाल्यास तो केवळ आपला विजय नसून आपल्याला साथ देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा विजय असेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांना सातत्याने प्रोत्साहन देतात, असे नमूद करत पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या मतदारसंघातून एखादी महिला विजयी झाल्यास इतिहास घडेल, असे सांगून त्यांनी मतदारांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.