भामा-आसखेड: देशातील अनेक पक्ष हे घराणेशाही म्हणून चालत आलेले आहेत. परंतु, भारतीय जनता पक्षात घराणेशाही नसून भाजप सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे विचार उत्तर पुण्याचे भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त उत्तर पुणे जिल्हा भाजपच्या वतीने संतोषनगर (ता. खेड) येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे ज्येष्ठ जुने कार्यकर्ते, बूथप्रमुख यांचा सत्कार करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
या वेळी भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, अटल बिहारी वाजपेयी, श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. या वेळी कार्यकर्त्यांनी जय श्री राम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. राज्यात दीड कोटी आणि पुणे जिल्ह्यात सव्वादोन लाख भाजप कार्यकर्ता सदस्य नोंदणी झाल्याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा केला.
ज्येष्ठ जुने भाजप कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी यांचा पक्षचिन्ह असलेले उपरणे व शाल, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी पुणे जिल्हा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेखर शेटे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वाळके, जिल्हा सरचिटणीस संजय रौधळ, माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग ठाकूर, दत्तात्रय वाडेकर, संपत बवले, अशोक उमरगेकर, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय टेमगिरे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष काळुराम पिंजन, भगवान मेदनकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा ठाकर, सुनील देवकर, रोहित डावरे पाटील, किरण राक्षे, भागवत आवटे, सरपंच पूजा बुट्टे पाटील, जया कड, रत्ना पिंगळे, वैशाली काळे, शिवाकाली खेंगले आदी प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी पांडुरंग ठाकूर व संपत बवले यांनी मनोगत व्यक्त करताना खेड तालुक्यात पक्षवाढीसाठी काम करताना आलेल्या संकटांचा सामना कसा केला, याबाबत माहिती दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमांची सांगता झाली. सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर यांनी केले. आभार सरचिटणीस रौधळ यांनी मानले.