खोर (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : देशात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य नागरिकांच्या व महिलांच्या हिताचे काम करीत आहे. मात्र, केवळ राजकीय द्वेषाने देशात व राज्यात भाजपला बदनाम करण्याचे कटकारस्थान केले जात आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले आहे. केडगाव चौफुला (ता. दौंड) येथे भाजपच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्या प्रसंगी वाघ बोलत होत्या.
शिंदे-फडवणीस सरकार आल्यानंतर काही महिलांवर अत्याचार झाले असताना कामामध्ये कामचुकारपणा करणार्या डझनभर पोलिसांचे निलंबन सरकारने केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देशभरात सातत्याने बॉम्बस्फोटांच्या घटना घडत होत्या. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बॉम्बस्फोटांच्या घटना घडत नाहीत, असेही वाघ यांनी सांगितले.
भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कांचन कुल म्हणाल्या की, भीमा-पाटस कारखाना सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच, महिलांना महिलांचे सहकार्य लाभल्यास निश्चित क्रांती घडेल. आमदार राहुल कुल म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांना सातत्याने संधी दिली जाते. महिलांनी त्या संधीचे सोने केले पाहिजे. विकासाची गंगा सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचली पाहिजे, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रसंगी माजी आमदार रंजना कुल, नामदेव बारवकर, माऊली ताकवणे, हरिश्चंद्र ठोंबरे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.