भाजप File Photo
पुणे

Assembly Election 2024 : पुण्यातल्या भाजपच्या इच्छुकांनी वाचला आमदारांविषयी नाराजीचा पाढा

पुढारी वृत्तसेवा

विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांची नावे संसदीय समितीकडे पाठविण्यात आली आहेत. समिती त्यावर निर्णय घेईल. मात्र, उमेदवारी मिळाली नाही तर नाराज न होता पक्षाचे काम करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इच्छुक उमेदवारांना केले. या वेळी इच्छुकांनी मात्र विद्यमान आमदारांविषयी नाराजीचा पाढा वाचत आपल्या भावना व्यक्त केल्या.

शहरातील शिवाजीनगर, पर्वती, खडकवासला, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कोथरूड मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. मात्र, या सर्व मतदारसंघात इच्छुकांची संख्याही मोठी आहे. त्यातील अनेकांनी थेट विद्यमान आमदारांच्या उमेदवारीला विरोध करत निवडणूक लढण्याचा पवित्रा घेतला आहे. इच्छुकांच्या या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे, ही बाब लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी इच्छुक उमेदवारांनी वैयक्तिकरीत्या चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. या वेळी अनेक इच्छुकांनी विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली. तर काहींनी संबंधितांना उमेदवारी दिली तर आपली जागा कशी धोक्यात येईल, याचा लेखाजोखाच मांडला. या सर्व इच्छुकांची मते जाणून घेतानाच बावनकुळे यांनी मात्र, सर्व इच्छुकांना तुमच्या उमेदवारीची शिफारस पक्षाच्या संसदीय समितीकडे केली आहे. त्यावर समिती योग्य तो निर्णय घेईल. मात्र, ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे काम अन्य इच्छुकांनी नाराज न होता करायचे, असे सांगितले. तर काही इच्छुकांना तर थेट तुझे काम झाले आहे, शांत रहा, असे सांगत अप्रत्यक्षरित्या ग्रीन सिग्नल दिला असल्याचेही इच्छुकांकडून सांगण्यात आले.

या इच्छुकांनी घेतली भेट

प्रामुख्याने बावनकुळे यांनी शिवाजीनगर मतदारसंघातील अ‍ॅड. मधुकर मुसळे, संदिप काळे, पर्वतीमधून आबा शिळीमकर, खडकवासला मतदारसंघातून मंजुषा नागपुरे, दिलीप वेडेपाटील, प्रसन्न जगताप, पुणे कॅन्टोमेन्टमधील किरण कांबळे, भरत वैरागे यांच्याशी चर्चा केली. याशिवाय आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांनीही बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

मुळीक, भिमाले, बालवडकर यांची अनुपस्थिती

पर्वती मतदारसंघातून इच्छुक असलेल्या श्रीनाथ भिमाले यांना कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असली तरी भिमाले यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित होते. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात दंड थोपटणारे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही बैठकीकडे पाठ फिरवली. याशिवाय वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी आमदार जगदिश मुळीक हेही बैठकीला अनुपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT