पांडुरंग सांडभोर
पुणे : आगामी महापालिका निवडणुका महायुती एकत्र येऊन लढविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असले, तरी पुण्यात मात्र महायुती म्हणून निवडणूक लढविणे जवळपास अशक्य ठरणार आहे. महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही एकमेकांचे प्रमुख स्पर्धक असल्याने जागा वाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यामुळे किमान पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये स्वबळावरच निवडणुका लढवाव्या लागतील, असे चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. पुढील चार महिन्यांत या निवडणुका होतील. न्यायालयाच्या आदेशावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढविणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पुणे महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढविणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महायुतीमध्ये एकत्र असले तरी पुण्यात तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेच एकमेकांचे प्रमुख स्पर्धक आहेत. 2017 च्या महापालिका निवडणुकीत 164 पैकी 99 जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 42 जागा जिंकून दुसर्या क्रमाकाचा पक्ष होता.
आता आगामी महापालिका निवडणुकीसाठी महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढण्याचा निर्णय झाल्यास 2017 मध्ये जिंकलेल्या सर्व जागांवर भाजप दावा करणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला जेमतेम 50 जागा आणि शिवसेनेला जेमतेम 8 ते 10 जागा मिळतील. त्यामुळे भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसला जागा वाटप मान्य होणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा हाच एकत्र निवडणुकीतील कळीचा मुद्दा असून, तो कितपत सोडविता येईल, याबाबत सांशकता आहे. त्यामुळेच सर्वच शहराध्यक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे.
महायुतीने एकत्र निवडणूक लढविल्यास त्याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढविणार का, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, महायुतीमध्ये उमेदवारीची संधी न मिळालेले इच्छुक महाविकास आघाडीला उमेदवार म्हणून मिळतील. त्यामुळे आता ज्या ठिकाणी आघाडीकडे उमेदवार नाहीत, तिथे ताकदवान उमेदवार मिळाल्यास महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू ठरणार आहे.
केंद्रात आणि राज्यातही सत्तेवर असलेल्या महायुतीमधील तीनही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. भाजपकडे जवळपास सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढविता येतील, असे सक्षम उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडेही अपवाद वगळता सर्वच जागांवर इच्छुक उमेदवार आहेत. शहरात तुलनेने कुमकुवत असलेल्या शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे. जर महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची भीती आहे.