पुणे

पुणे : जैववैद्यकीय कचर्‍याने वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका

अमृता चौगुले

वरकुटे बुद्रुक : पुढारी वृत्तसेवा :  जैववैद्यकीय कचर्‍याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत गागरगाव (ता. इंदापूर) हद्दीतील वनीकरणात तो उघड्यावर फेकून दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे परिसरातील मानवी आरोग्यासह वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ई-कचर्‍याप्रमाणेच जैववैद्यकीय कचर्‍याची योग्य विल्हेवाट न लावल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक ठरू शकते.

अशातच या जैववैद्यकीय कचर्‍यामध्ये वापरलेली इंजेक्शन्स, मलमपट्टी केलेले कापसाचे बोळे, शस्त्रक्रिया करून काढलेले भाग, बँडेज, रक्त, थुंकी, लघवीचे नमुने, एक्सपायर झालेल्या गोळ्या-औषधांचे ढीग पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत गागरगाव येथील वनीकरणात उघड्यावरच साचलेले आहेत. या वनीकरणामध्ये हरीण, ससे व लांडगे यांसारखे वन्यजीव तसेच अन्य पशुपक्षी आहेत. पाण्याच्या किंवा अन्नाच्या शोधात हे वन्यजीव अनेकवेळा हा जैवकचरा पडलेल्या भागात स्थानिकांकडून पाहण्यात आला आहे. त्यामुळे या वन्यजीवांच्या जिवास धोका निर्माण होत आहे. वनीकरणातील जैववैद्यकीय कचरा, खुलेआम धुडगूस घालणार्‍या दारुड्यांवर वन विभाग अधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. त्यामुळे संरक्षणासाठी कार्यरत असणार्‍या अधिकार्‍यांकडूनच वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात आल्याचे चित्र आहे. या परिस्थितीवर वन्यप्राणिमित्रांकडून मोठ्या प्रमाणात असंतोष व्यक्त होत आहे. लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी; अन्यथा वन विभागाच्या कार्यालयापुढे आंदोलन करणार असल्याचे प्राणिमित्रांकडून सांगण्यात आले.

वनीकरण झाले उकिरडा
गागरगाव वनीकरणामधून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जातो. महामार्गाच्या दुतर्फा कचरा फेकून दिला जात आहे. अक्षरश: या महामार्गाचा कचराकुंडीसारखा वापर केला जात आहे. त्यामुळे या वनीकरणाला उकिरड्याचे स्वरूप आले आहे. या कचर्‍यातून दुर्गंधी पसरून पसरत आहे.

गागरगाव वनीकरणामध्ये जैववैद्यकीय कचरा टाकण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. याबाबत इंदापुरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना सूचना दिल्या आहेत. परंतु, कोणीही टाकल्याची कबुली देत नसल्यामुळे कारवाई करता येत नाही. जैववैद्यकीय कचरा निदर्शनास आल्यास आमच्या विभागाकडून त्याची वेळोवेळी विल्हेवाट लावली जात आहे.
– अजित सूर्यवंशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, इंदापूर

SCROLL FOR NEXT