खडकवासला: राजगड, तोरणा, सिंहगड परिसरासह पानशेत, वरसगाव खोर्यातील हिरव्यागार मावळी बांबूंना गुढीपाडवा सणामुळे चांगला बाजारभाव मिळत आहे. तसेच, शेतीसाठीही या बांबूंची मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्यांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. शेतीमालासाठी विक्री होणार्या बांबूंमुळे पुण्याच्या बाजारपेठेत दर आठवड्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
गुढीपाडव्याच्या सणासाठी बांबूंच्या विक्रीतून गेल्या चार-पाच दिवसांत तब्बल पन्नास ते साठ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. राजगड, तोरणा, भोर, तसेच मुळशीच्या मावळ खोर्यातील पारंपरिक बांबूंला आजही पुण्यासह राज्यात चांगली मागणी आहे.
प्राचीन काळापासून हिंदू धर्मीयांच्या नवीन वर्षाच्या शुभारंभदिनी चैत्री पाडव्याला मानाचे स्थान असलेल्या या बांबूंला सध्याच्या आधुनिक युगातही चांगली मागणी आहे. गुढीपाडव्याच्या सणामुळे सिंहगड रस्ता, वारजे, पाषाण, तसेच उपनगरांतील बांबूंच्या बाजारपेठा फुलल्या आहेत.
दर्जेदार व पारंपरिक बांबूंच्या उत्पन्नासाठी राज्यासह देशभर प्रसिद्ध असलेल्या तोरणा, सिंहगड, भोर, राजगड, पानशेत आदी डोंगरी पट्ट्यातील बांबूंला गुढीपाडव्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. घेवंडे येथील शेतकरी शिवाजीराव कडू म्हणाले की, 16 ते 22 फुटी बांबूंला प्रतिनग 170 रुपयांचा भाव मिळत आहे. गुढी उभारण्यासाठी 6 ते 10 फूट उंचीचा एक तुकडा 30 ते 70 रुपयांना विकला जात आहे.
पानशेत, वरसगाव धरणे खोर्यातील बांबू थेट बाजारपेठेत नेल्यामुळे शेतकर्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे. मेसी बांबू 120 रुपयांपासून 150 रुपयांना विकला जात आहे. तर शेतकर्यांना जागेवरच एका बांबूला शंभर रुपये भाव मिळत आहे. पानशेत, वरसगाव, मुठा, वेल्हे, मुळशी, तोरणा खोर्यातील बांबू पुण्यासह राज्याच्या विविध भागांत जात आहे.- लालासाहेब पासलकर, बांबूंचे व्यापारी
गुढी उभारण्यासाठी बांबूचा वापर केला जातो. इतर कोणत्याही वृक्षांपेक्षा तसेच इतर साधनांपेक्षा हिरव्यागार बांबूची गुढी उभारणे पावित्र्याचे व मांगल्याचे मानले जाते. आकार व जाडीनुसार गुढीसाठी विकल्या जाणार्या बांबूची किंमत ठरते.- हनुमंत दिघे, बांबू उत्पादक शेतकरी, वेल्हे खुर्द