पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस ते भिगवण यादरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, टोलवसुलीत गर्क महामार्ग प्राधिकरण मात्र डोळ्यांवर झापड लावून बसले आहे. या खड्ड्यांमुळे वाहन व प्रवाशांचा खुळखुळा तर होत आहेच; शिवाय खड्डे चुकवायचे तरी किती? असा प्रश्न देखील वाहनचालकांना पडतो आहे. वाहनांची प्रचंड रेलचेल, वार्याशी स्पर्धा करणारी वाहनांची गती आणि पडलेल्या खड्ड्यांचा विचार करता टोल प्राधिकरण मोठ्या अपघाताची वाट पाहत बसले आहे की काय? असा प्रश्न रस्त्याच्या दुरवस्थेकडे पाहून निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
पाटस टोल नाक्यापासून खड्ड्यांचा झालेला प्रारंभ भिगवणपर्यंत समाप्त होत नाही. मुळात महामार्गावर वाहनांची गती ताशी 80 ते 120 किलोमीटर असल्याने वार्याशी स्पर्धा दिसून येते व अशा परिस्थितीत अचानक जागोजागी खड्डे दिसले की ते चुकवायचे की शेजारचे वाहन चुकवायचे, अशा द्विधा मन:स्थितीत चालक येतात. यातून मोठा अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे खड्डे लक्षात घेऊन काही ठिकाणी वरकरणी ठिगळे लावण्यात आली आहेत; तोवर दुसरीकडे खड्डे पडत आहेत.
पाटस टोल नाका ओलांडताच दोन्ही बाजूंच्या मार्गावर जागोजागी लहान-मोठ्या खड्ड्यांनी आपले रूप उग्र केले असून, खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताचा धोका वाढला आहे. पाटस ते सरडेवाडी टोल नाक्यावर टोलवसुलीसाठी तगादा लावला जातो. या प्रसंगी दमदाटी केली जाते, एखाद्या वाहनाचा टोल बॅलेन्स संपल्यास दुप्पट आकारणी केली जाते. तिथे थोडाही समजूतदारपणा दाखवला जात नाही. बॅलेन्स टाकला तर त्यासाठी 10 ते 15 मिनिटे वाट पाहावी लागते. टोलधाडवसुलीत जेवढी तत्परता दाखवली जाते, त्या प्रमाणात रस्तादुरुस्तीसाठी तत्परता का दाखवली जात नाही? असा प्रश्न खड्ड्यांकडे पाहून उपस्थित होत आहे.