Baramati Politics: बारामती विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या येथील शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्काॅडकडून सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने येथे तपासणी करण्यात आली, परंतु काहीही आक्षेपार्ह आढळलेले नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.
सोमवारी रात्री निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्काॅडने पोलिसांच्या मदतीने येथे तपासणी केली. परंतु तेथे काहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.
बारामतीत या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी अटीतटीची लढत होत आहे. विधानसभा निवडणूक काळात शरयू मोटर्समध्ये झालेले हे सर्च ऑपरेशन चर्चेचा विषय ठरले आहे.
याबाबत बारामतीचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर म्हणाले, निवडणूकीच्या काळात ज्या काही तक्रारी प्राप्त होतात त्या अनुषंगाने तपासणी केली जाते. शरयू टोयाटो शोरुममध्येही तपास पथक गेले होते. परंतु त्या ठिकाणी रोकड किंवा अन्य काही आक्षेपार्ह आढळून आलेले नाही.