भोर: भोर तालुक्यातील शेतकर्यांनी मेहनतीने घेतलेली उन्हाळी बागायती पिके अवकाळी पावसाच्या तडाख्याने पाण्याखाली गेली असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिसकावल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
भाटघर व निरा देवघर धरणाचे आवर्तन आणि विहिरीच्या पाण्यावर शेतकर्यांनी भुईमूग, घेवडा, सोयाबीन, टोमॅटो, काकडी, कलिंगड, कांदा व इतर भाज्यांची लागवड केली होती. ही पिके मे अखेरीस काढणीस येण्याच्या तयारीत असताना पावसामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः भुईमूग वेळेत न काढल्यास त्याला कोंब फुटतो आणि संपूर्ण पीक वाया जाते. (Latest Pune News)
या पावसामुळे खरीप हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मशागती लांबल्यास जमिनीत वाफसा मिळण्याची शक्यता कमी राहते. परिणामी, बियाण्यांची उगमशक्ती कमी होऊन खरीप हंगामाचे नियोजन कोलमडण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसामुळे खरीपाच्या वेळेस योग्य वाफसा मिळेल का, ही चिंता आहे, असे शिरवली तर्फे भोर येथील महिला शेतकरी शोभा चौधरी यांनी सांगितले. तर अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातही बियाणे खरेदी करण्याकडे शेतकर्यांनी पाठ दाखविली. ज्यांनी बियाणे खरेदी केली आहेत, त्यांची पेरणी न झाल्यास ती वाया जाण्याचा धोका भोर येथील कृषी केंद्रचालक तानाजी मरागजे यांनी व्यक्त केला.