पुणे

बारामती : तमाशाला नारळ वाढविण्यासाठी सव्वा लाखाची बोली

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा : यात्रा-जत्राच्या हंगामामुळे सध्या गावोगावचे वातावरण ढवळून निघाले आहे. यात्रेतील तमाशाच्या कार्यक्रमाची ग्रामीण भागात भलतीच क्रेझ आहे. त्यात तमाशाचा नारळ वाढविण्याचा मान अनेकांना भावतो. कर्‍हा वागज (ता. बारामती) येथे राजेंद्र भाऊ नाळे यांनी यात्रेनिमित्त आयोजित तमाशाचा नारळ वाढविण्यासाठी तब्बल सव्वालाख रुपयांची बोली लावली. प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लागल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे.

ग्रामीण भागात अजूनही तमाशा ही लोककला प्रसिद्ध आहे. तमाशाचे वेड तरुणाईपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आहे. त्यामुळे तमाशाचा नारळ हातून फोडणे यासाठी नेहमीच चढाओढ लागलेली पाहायला मिळते. कर्‍हा वागजच्या ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा दि. 14 व 15 एप्रिल रोजी पार पडत आहे. त्यामध्ये रात्रीच्या तमाशा कार्यक्रमाचा नारळ वाढविण्यासाठी नाळे यांनी तब्बल सव्वालाखाची बोली लावली.

तर दिवसा होणार्‍या तमाशाचा नारळ वाढविण्यासाठी नवनाथ वायाळ यांनी 55 हजारांची बोली लावली आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांहून अधिक काळापासून तमाशा बंद होता. त्यामुळे अनेक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना दोन वेळचे अन्न मिळणे महाग झाले होते. मात्र, यंदाच्या वर्षी अनेक ठिकाणी यात्रांना चांगली गर्दी होत आहे. त्यामुळे तमाशा फडांनाही चांगल्या सुपार्‍या मिळाल्या आहेत.

प्रशासक असल्याने बोली लावण्याचा निर्णय
कर्‍हावागज ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांची मुदत संपलेली आहे. प्रथेनुसार गावोगावी यात्रांमध्ये प्रथम नागरिक या नात्याने सरपंचांना तमाशा किंवा अन्य मनोरंजनाच्या कार्यक्रमात नारळ वाढविण्याचा मान मिळतो. ग्रामपंचायत कार्यकारिणी अस्तित्वात नसल्याने नारळ वाढविण्यावरून वाद नको, या कारणावरून यात्रा समितीने बोली लावण्याचा निर्णय यंदा घेतला. त्यातून चांगला आर्थिक फायदा झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT