पुणे

पुणे : रेंगाळलेल्या कामामुळे बिबवेवाडीकर हैराण

अमृता चौगुले

बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा :  बिबवेवाडी परिसरातील विविध रस्त्यांची कामे सुरू असून, ती 'वर्क ऑर्डर' प्रमाणे होत नसल्याचे दिसून येत आहे. महेश सोसायटी चौक ते चिंतामणीनगरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास तब्बल दीड वर्षे लागली. चिंतामणीनगर ते डॉल्फिन चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले असून, या कामांमध्ये महापालिकेचा ड्रेनेज विभाग, पाणीपुरवठा विभाग, पथ विभाग यांच्या समन्वयाच्या अभावामुळे दिरंगाई होत आहे. ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी कामाबाबत उत्साही नाहीत, असे दिसून येते.

चिंतामणीनगरजवळील रस्ता दोन्ही बाजूंनी खोदून ठेवला आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा सुरू असून, विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप होत आहे. सकाळी तसेच सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी यामुळे या परिसरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिक तसेच बिबवेवाडी परिसरातील कामगार, कष्टकरी यांची मोठी कसरत असते. सकाळच्या वेळी कचर्‍याच्या गाड्या व रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडतात. अवजड वाहनांची वर्दळ असल्यामुळे बिबवेवाडीकरांची पुरती दमछाक होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी नळ्या, पाइप टाकून ठेवले आहेत. काही ठिकाणी मातीचे ढिगारे व या कामासाठी लागणारी अवजड मोठी मोठी वाहने यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडते. चिंतामणीनगर येथील वाहतुकीच्या कोंडीवर नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलिस फारसे काही करताना दिसत नाहीत. बिबवेवाडीकरांच्या सहनशीलतेचा अंत महापालिकेने व ठेकेदारांनी पाहू नये, असे या भागातील दुकानदार व व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून बिबवेवाडी पोलिस ठाण्यापासून चिंतामणीनगरपर्यंत रस्त्याचे खोदकाम व काँक्रीटीकरण चालू आहे. महापालिकेच्या व ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे दोन्ही बाजूंनी रस्ता खोदून ठेवल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. ती त्वरित दूर करावी; अन्यथा प्रशासनाच्या कारभाराच्या निषेधार्थ आंदोलन करावे लागेल.
     सचिन साठे, अध्यक्ष, गनिमीकावा युवा संघटना, मातंग आघाडी, पुणे शहर.

बिबवेवाडीत विकासकामे चालू आहेत. विकासकामांमध्ये थोड्याफार प्रमाणात कमी-जास्त कालावधी होत आहे. तसेच या भागातील विविध खात्यांच्या कामातील दिरंगाईमुळे थोडाफार उशीर झाला आहे. पुढील एक ते दीड महिन्यात चिंतामणीनगर ते डॉल्फिन चौकापर्यंतचा रस्ता पूर्ण केला जाणार आहे.
                              आदिल तडवी, उपअभियंता, पथविभाग, महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT