रविवारी अंसारी कुटुंबातील पाच जण भुशी धरणात वाहून गेले  पुढारी
पुणे

भुशी धरण दुर्घटना | लग्नाच्या पाच दिवसांतच आनंद वाहून गेला!

सय्यदनगर परिसर झाला सुन्न; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी; नातेवाइकांचा टाहो अन् मैत्रिणींचा आक्रोश

पुढारी वृत्तसेवा
सुरेश मोरे

कोंढवा : माझं लग्न 25 जूनला झालं, त्याचा आनंद साजरा करण्यासाठी आम्ही सर्व कुटुंबीय भुशी धरणावर गेलो, पण जोरदार लोंढ्याने आमच्या कुटुंबातील पाच जणांना वाहून नेले. लग्नानंतरच्या अवघ्या पाच दिवसांत आमचा आनंद वाहून गेला... या भावना आहेत भुशी दुर्घटनेत वाचलेल्या तारीक अन्सारी यांच्या.

मारियाच्या मृतदेहचा शोध सुरू

नूरी परवीन अन्सारी (वय 40), आमीमा अन्सारी (वय 13), मारिया अन्सारी (वय 6), हुमेरा अन्सारी (वय 6) आणि अदनान अन्सारी (वय 6) हे पाच जण भुशी धरण परिसरातून वाहून गेले. यापैकी चार जणांचे मृतदेह शोध पथकाला सापडले आहेत. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले असून, मारिया अन्सारी हिच्या मृतदेहावर रविवारी दि. 30) रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. पाचव्या मुलाचा शोध पथकाकडून सुरू असल्याचे समजते.

'...अडीच तास मदत मिळाली नाही'

तारीक अन्सारी यांचे गेल्या 25 जून रोजी सय्यदनगरमध्ये लग्न झाले. त्याच लग्नाचा आनंद म्हणून अन्सारी कुटुंबातील 19 सदस्य लोणावळ्याच्या भुशी धरणावर फिरायला गेले होते. तारीक अन्सारी सांगतात की, ज्या वेळेला आम्ही 10 जण पाण्यात उतरलो, त्या वेळी घोट्याएवढे पाणी होते. अचानकच पाणी वाढले, आम्हाला त्याची कल्पना यायच्या आतच पाणी खूप वाढले.

मला पोहायला येत नाही. कसेबसे हातपाय हलवून बाहेर आलो व एका झाडाच्या फांदीला पकडले. जवळपास अडीच तास आम्हाला मदत मिळाली नाही. वेळेत मदत मिळाली असती, तर सर्वजण वाचले असते, अशी खंत तारीक अन्सारी यांनी व्यक्त केली.

आमीमाला डॉक्टर बनायचे होते

लोणावळ्याच्या भुशी धरण परिसरातून वाहून गेलेल्या चार मुलांपैकी आमीमा अन्सारी ही इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. तिला डॉक्टर होऊन समाजसेवा करायची होती. सर्वांबरोबर मिळूनमिसळून राहणार्‍या आमीमाच्या मृत्यूची बातमी कळताच मैत्रिणी, शिक्षक व परिसरातील नागरिकांना अश्रू अनावर झाले.

न्यू चॅम्प इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेमध्ये आमीमा इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. बाकीची तीन मुले लिमरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होती.

दुर्घटनेत मायालेकींचा मृत्यू

साहिस्ता अन्सारी वय (37) यांचा आणि त्यांची मुलगी मारिया अन्सारी वय (7) या दोघी मायालेकींचा मृत्यू या दुर्घटनेत झाला. साहिस्ता या चिंतामणीनगर येथे छोटेखानी भांड्यांचा व्यवसाय करून आपला उदरर्निवाह करत होत्या. अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.

आमीमाचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी कळताच मन सुन्न झाले. शाळेतील तिच्या मैत्रिणी, विद्यार्थी रडू लागले. शिक्षकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. आमीमा हुशार आणि टॉपर मुलगी होती. मिळूनमिसळून राहायची, कसलीच तक्रार तिची नव्हती. अशी गुणी विद्यार्थिनी आमच्यातून निघून गेली, हे खरेच वाटत नाही.
मोईन शेख, अध्यक्ष, न्यू चॅम्प इंग्लिश मीडियम स्कूल, सय्यदनगर
राज्य सरकार लोकांचे मृत्यू झाल्यानंतर जागे होते व नंतर उपाययोजना राबविते. या अगोदर भुशी धरण परिसरात अशा घटना घडल्यात. तो धडा घेऊन तरी कडक उपाययोजना अमलात आणल्या असत्या तर अन्सारी कुटुंबीयांवर दु:खाची वेळ आली नसती. या कुटुंबीयांना शासनाने भरघोस मदत करावी.
इमरान शेख, संघटक, काँग्रेस कमिटी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT