पुणे

पुणे : कृषी आयुक्तालयाच्या भूमिपूजनास मुहूर्त

अमृता चौगुले

किशोर बरकाले : 

पुणे : कृषी आयुक्तालयाचे शिवाजीनगर येथील स्वतंत्र संकुल उभारण्याचा आराखडा मंत्रालयस्तरावरही अंतिम झाला असून, निविदाप्रक्रियाही राबविण्यात येत आहे. कृषी भवन परिसरात सहा एकर जागेवरील स्वतंत्र संकुलच्या भूमिपूजनाचा मुहूर्त 15 मार्चच्या सुमारास निश्चित करण्यावर बांधकाम विभागाच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत.

249 कोटी खर्चाचे आणि सहा लाख चौरस फुटांहून अधिक बांधकाम असणारे पुण्यातील शासकीय कार्यालयांमधील सर्वांत मोठे प्रशासकीय देखणे संकुल उभे करण्याचे काम सुरू होईल. या बाबतच्या नकाशास कृषी विभागाने 9 नोव्हेंबरला मान्यता दिली असून, कृषी आयुक्तालयाची प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, वाहनतळ, प्रेक्षागृह इमारतीचे संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे.
राज्याचे कृषी आयुक्तालय पुण्यात मध्यवर्ती इमारतीत कार्यरत आहे. मात्र, अन्य कार्यालये शिवाजीनगर परिसरात आहेत. शिवाजीनगर येथील कृषी भवन या 1972 मध्ये उभारलेल्या इमारतीची स्थिती धोकादायक आहे.

कृषी संकुल उभारणीच्या एकूण निश्चित केलेल्या जागेचा विचार करता ही इमारत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आहे तसेच ठेवण्यात येणार आहे. मात्र, फलोत्पादन संचालनालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, हवेली तालुका कृषी व मंडल कृषी अधिकारी कार्यालय इमारत उभारणीसाठी पाडण्यात येणार आहे. या कार्यालयांची तात्पुरती व्यवस्था याच ठिकाणी शेडमध्ये करण्याचे कामही अंतिम टप्प्यात  आहे.

पहिली मोठी शेड पाच हजार चौरस फुटांची असून, फलोत्पादन संचालकांसाठीचा कक्ष एक हजार पन्नास चौरस फुटांचा आहे. तर अधीक्षक कार्यालयास लागून पूर्वेकडेही दोन स्वतंत्र शेड उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात पाडण्यात येणार्‍या सध्याच्या इमारतींमधील कर्मचार्‍यांची बैठक व्यवस्था शेडमध्ये करण्याचे कामही अंतिम टप्प्यात
आले आहे.

कृषी आयुक्तालयाच्या इमारत बांधकामापूर्वी तात्पुरत्या अद्ययावत शेडमध्ये तेथील कार्यालयांची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचे ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील पंधरवड्यात विजेच्या व्यवस्थेसह कार्यालये सुरू करता येतील आणि 15 मार्चच्या सुमारास कृषी आयुक्तालयाचे भूमिपूजन घेण्याचे नियोजन आम्ही केले आहे.
        – शरद वाडेकर,  शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे.

कृषी आयुक्त बंगला 'रामेती'च्या जागेवर

सार्वजनिक बांधकाम विभागाने कृषी संकुलच्या इमारतीला लागूनच पूर्वीच्या आराखड्यात कृषी आयुक्तांच्या बंगल्याचे नियोजन साखर संकुलमधील साखर आयुक्तांच्या बंगल्याप्रमाणेच केले होते. ते आता बदलण्यात आले असून, शिवाजीनगर-आकाशवाणी चौकाजवळ कृषी विभागाच्या असणार्‍या प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था तथा 'रामेती'च्या 389 चौरस मीटरच्या जागेवर बांधण्यात येणार आहे. तळमजला अधिक एक मजला आणि एक कामगार निवास असे बांधकामाचे स्वरूप आहे.

प्रयोगशाळा आणि प्रशस्त सभागृहही…

नव्या इमारत बांधकामांमध्ये प्रामुख्याने कृषी आयुक्तालयांतर्गत कार्यरत शहरातील सर्व कार्यालये कृषी संकुलच्या उभारणीमुळे एकाच छताखाली येणार आहेत. मुख्य प्रशासकीय इमारत ही तळमजला अधिक आठ मजले राहील. 23 हजार 207 चौरस मीटरचे हे बांधकाम आहे. दोन प्रयोगशाळांच्या दोन इमारती उभारण्यात येणार असून, तळमजला अधिक पाच मजल्यांचे मिळून एकूण
7 हजार 122 चौरस मीटर  बांधकाम राहील.

बहुमजली चारचाकी-दुचाकी वाहनतळ इमारतीचा तळमजला अधिक सात मजल्यांचे बांधकाम होणार आहे. त्याचे एकूण बांधकामाचे क्षेत्रफळ 25 हजार 538 चौरस मीटर इतके असून, 512 चारचाकी वाहने आणि सुमारे 2 हजार 500 दुचाकी वाहनक्षमतेचे प्रशस्त पार्कगिं प्रस्तावित आहे. याच इमारतीत सातव्या मजल्यावर 500 आसनक्षमतेचे प्रेक्षागृह असणार आहे. अतिथीगृह तथा गेस्ट हाऊसची स्वतंत्र इमारत असून, तळमजला अधिक दुमजली इमारतीचे बांधकाम 670 चौरस मीटर इतके आहे. त्यामध्ये दोन व्हीआयपी सूट, दोन डिलक्स सूट, सहा गेस्ट रूम प्रस्तावित आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT