माळशिरस; पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस येथील दौंड व पुरंदर तालुक्यांना जोडणार्या भुलेश्वर घाटाची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. रस्त्याच्या कडेला मोठमोठी झाडे वाढल्याने हा घाट अपघाताला आमंत्रण देत आहे. या घाटरस्त्यावरील अपघातास निमंत्रण देणारी झुडपे काढण्यात यावीत, यासाठी माळशिरस गावचे सरपंच महादेव बोरावके यांनी वन विभागाला, तर उपसरपंच राजेंद्र गद्रे यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांना निवेदन दिले आहे.
दौंड व शिरूर या भागांतून कोल्हापूर, सातारा, भोर या भागांत जाण्यासाठी पूर्वी पुण्यातून वाहतूक करावी लागत असे. परंतु, भुलेश्वर घाट वाहतुकीस चांगला असल्याने व कमी वेळात वाहतूक होत असल्याने सध्या या भागातून मोठ्या प्रमाणात दळणवळण होत आहे. तसेच, या मार्गावर श्री क्षेत्र भुलेश्वर, बनेश्वर, बालाजी मंदिर, नारायणपूर, सिद्धेश्वर मंदिर, पांडेश्वर ही ऐतिहासिक धार्मिकस्थळे असल्याने या मार्गावर कायम भाविकांची वर्दळ असते.
दरम्यान, पुरंदर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बांधकाम विभाग व वन विभाग यांना श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी
भुलेश्वर घाटातील वळणावरील व अपघातास कारणीभूत असणारी
घातक झुडपे व फांद्या तोडण्याच्या सूचना देऊनही कार्यवाही काहीच झालेली नाही. पावसाळ्यानंतर दरवर्षी भुलेश्वर घाटात असणारी जंगली झाडे इतक्या जास्त प्रमाणात वाढतात की झाडांच्या फांद्या रस्त्यावर येतात. यामुळे अनेकदा या घाटात अपघात होऊन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. घाटातील सर्व वळणांवर लोखंडी कठडे बसविण्यात यावीत, दिशादर्शक फलक बसविणे, घाटामध्ये सौरदिवे बसविण्यात यावीत, अशी मागणी या घाटातून प्रवास करणार्या प्रवाशांमधून होत आहे.
वन विभागाच्या कात्रीत सापडला आहे घाटरस्ता
यवत-सासवड रस्त्यावरील हा घाट असून, दौंड व पुरंदर तालुका यांना जोडणारा हा रस्ता आहे. परंतु, या घाटाला दोन तालुक्यांची हद्द असल्याने हा घाट सुरुवातीपासूनच वन विभागाच्या कात्रीत सापडला आहे. या घाटातील कामाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही तालुक्यांच्या हद्दीमध्ये हे काम वन विभागाने बंद केले होते. यामुळे घाटाच्या कामाला सुरुवातीपासूनच अनेक अडथळे निर्माण झाले होते.