पुणे

पिरंगुट : वर्षाविहारासाठी आलेल्या वाहनांमुळे भूगावला कोंडी

अमृता चौगुले

पिरंगुट(पुणे); पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यामध्ये वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्यांमुळे भूगावमध्ये दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे स्थानिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे 'शनिवार, रविवार असला की, घरातून बाहेर पडावे की नाही?' अशी संतापजनक प्रतिक्रिया परिसरामध्ये राहणार्‍या महिला व्यक्त करत आहेत.
येथे होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली असून, याला भूगावकर त्रस्त झालेच आहेत. दुसरीकडे कोकणातून तसेच पौडकडून येणारी वाहनेसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडतात.

त्यामुळे या अडचणीवर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. येथील कोंडी फोडण्यासाठी सर्वप्रथम रस्त्यावरील खड्डे बुजवून व्यवस्थित चांगल्या दर्जाचा रस्ता होणे गरजेचे आहे, तसेच ग्रामपंचायतीसमोर असलेले दोन्ही बसथांबे गावाच्या पूर्व किंवा पश्चिम बाजूला हलविणे गरजेचे आहे. हा उपाय तात्पुरता असून, येथून जो बाह्यवळण मार्ग नियोजित आहे, तो तातडीने पूर्ण करावा, अशी येथील रहिवाशांनी मागणी केलेली आहे. तसेच या परिसरात कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नेमण्यात यावेत, अशी मागणी येथील व्यापार्‍यांनी केली आहे.

शनिवार, रविवारी घरी थांबलेलंच बरं !

मुळशी तालुक्यामध्ये फिरायला येणारे तरुण आणि दारुडे वाहनचालक बेशिस्तपणे आणि बेदरकारपणे वाहन चालवतात, त्यामुळे कधीही अपघात होऊन जीव जाईल, अशी भीती असते. गेल्या दोन वर्षांमध्ये फक्त भूगावमध्ये अनेक नागरिकांनी या पर्यटकांच्या गाड्यांच्या अपघातामुळे जीव गमावले तसेच अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे शनिवार, रविवार म्हटले की, आपलं घरीच थांबलेलं चांगलं बाबा, असा विचार स्थानिक नागरिक करतात.

या रस्त्याचा आम्ही गेले दोन दिवस सर्व्हे करीत आहोत. रविवारी (दि. 23) रात्री येथील सर्व खड्डे भरून घेण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिलेल्या आहे. तो हे खड्डे शनिवारी (दि. 22) रात्रीच भरणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

– श्रुती नाईक,
अभियंता, एमएसआरडीसी

ग्रामपंचायतीसमोरील दोन्ही बाजूंचे बस थांबे गावठाणाच्या पूर्व बाजूस हलविण्यासंदर्भात लवकरच पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून ते बस थांबे हलविण्यात येतील, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

– अक्षय सातपुते,
माजी उपसरपंच, भूगाव.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT